अग्निशमन यंत्रणेअभावी ‘शिवशाही’ धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 06:12 AM2018-05-16T06:12:10+5:302018-05-16T06:12:10+5:30

एसटी महामंडळाच्या कंत्राटी २५ शिवशाही अग्निशमन यंत्रणेअभावी कुर्ला नेहरू नगर येथे धूळखात आहेत.

'Shivshahi' dust in the fire due to fire fighting machinery | अग्निशमन यंत्रणेअभावी ‘शिवशाही’ धूळखात

अग्निशमन यंत्रणेअभावी ‘शिवशाही’ धूळखात

Next

मुंबई : एसटी महामंडळाच्या कंत्राटी २५ शिवशाही अग्निशमन यंत्रणेअभावी कुर्ला नेहरू नगर येथे धूळखात आहेत. करारानुसार अटींची पूर्तता न केल्यामुळे कंत्राटदारांच्या नवीन शिवशाही महामंडळाने कुर्ला आगारात उभ्या केल्या आहेत. यामुळे करारभंग करणाऱ्या खासगी कंत्राटदारांवर महामंडळ नक्की काय कारवाई करेल, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांची ‘ड्रीम एसटी’ म्हणून महामंडळाच्या ताफ्यात ‘शिवशाही’ दाखल झाली. खासगी वाहतूक सेवेला टक्कर देण्यासाठी महामंडळाने शिवशाही सुरू केली. मात्र खासगी कंत्राटदारांकडून महामंडळाची फसवणूक करण्याचे प्रकार घडल्याचे दिसून येत आहे. महामंडळाने केलेल्या करारानुसार अत्याधुनिक आणि वातानुकूलित शिवशाहीमध्ये एलईडी स्क्रीन (टीव्ही), मोफत वाय-फाय आणि अग्निशमन यंत्रणा असणे अनिवार्य आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने २ हजार शिवशाही भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. यासाठी राज्यातील ७ खासगी कंत्राटदारांशी करार करण्यात आला होता. करारानुसार १५० शयनयान शिवशाही आणि उर्वरित आसनी शिवशाही टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत.
खासगी कंत्राटदारांनी प्रोटोटाइपनुसार बनवलेल्या पहिल्या शिवशाहीमध्ये या सुविधा दिल्या. मात्र त्यानंतरच्या शयनयान आणि आसनी शिवशाहीमध्ये या सुविधा नसल्याचे दिसून आले. आपत्कालीन परिस्थितीत वातानुकूलित शिवशाहीमध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्याने थेट प्रवासी सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अशा प्रकारच्या सुमारे २५ शिवशाही कुर्ला नेहरू नगर आगारात उभ्या आहेत. यात ७ शयनयान शिवशाहींचादेखील समावेश आहे.
कंत्राटदारांना अधिकाºयांचा पाठिंबा?
२५ नवीन शिवशाही कुर्ला नेहरू नगर आगारात धुळखात उभ्या आहेत. याबाबत महामंडळातील वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक आर.आर. पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. खासगी कंत्राटदारांच्या फसवणूक करण्याच्या वृत्तीवर कारवाई करण्यास वरिष्ठ अधिकारी टाळाटाळ करत असल्याची चर्चा सध्या महामंडळाच्या वर्तुळात रंगत आहे.

Web Title: 'Shivshahi' dust in the fire due to fire fighting machinery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.