Join us  

शिवभक्त निघाले भीमाशंकरला...

By admin | Published: August 11, 2016 4:12 AM

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर येथील भगवान शंकराचे स्थान असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी श्रावण महिन्यात पावले चालू लागली आहेत

विजय मांडे, कर्जतबारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर येथील भगवान शंकराचे स्थान असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी श्रावण महिन्यात पावले चालू लागली आहेत. भीमाशंकरला जाण्याचे अनेक मार्ग आहेत, परंतु असंख्य शिवभक्त कर्जत तालुक्यातील भीमाशंकर अभयारण्य भागातून जाणाऱ्या पायवाटेचा मार्ग अवलंबत आहेत. अभयारण्य भागातून जाणारे रस्ते ट्रेकर्सला खुणावत आहेत.भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यातील भगवान शंकराचे स्वयंभू शिवलिंग असलेले ठिकाण आहे. त्या ठिकाणी थेट वाहने जाऊ शकतात, प्रामुख्याने श्रावण महिन्यात हजारोंच्या संख्येने शिवभक्त भीमाशंकर डोंगर रांगांत पोहचून शिवलिंगाचे दर्शन घेतात. मात्र त्या ठिकाणी जाण्यासाठी अनेक मार्ग शिवभक्त अवलंबत असतात. त्यात कर्जत तालुक्यातून आणि मुरबाड तालुक्यातून जाणारे मार्ग हे काहीसे खडतर असले तरी ट्रेकर्स भीमाशंकर अभयारण्याची सैर करीत तेथे पोहचतात. कर्जत तालुक्यातील खांडस मार्गे गणपती घाटातून जाणारी पायवाट अधिक सोपी असल्याने सर्वाधिक भक्त या मार्गाने भीमाशंकरला पोहचतात. खांडस येथील अडीच ते तीन तासांवर भीमाशंकर असून मुरबाडकडून बैलघाटातून येणारा रस्ता थेट भीमाशंकरला पोहचतो. या सर्व मार्गाने अनेक ठिकाणी चढाव असले तरी जागोजागी असलेले धबधबे आणि रानातील लहान-लहान ओढे थकवा जाणवू देत नाहीत.भीमाशंकर अभयारण्यामधून जाताना आडवा पदर भागातील पायवाट भक्तांची कसोटी पाहत असतो. कारण तेथे मोठ्या आणि विस्तीर्ण दरीच्या भागातून जाताना अंगावर येणारे धुक्याचे लोट आणि वातावरणातील गारव्याबरोबर आडवा पदर सोडून पुढे गेलो की सपाट प्रदेश लागतो, मात्र तेथे डोक्याभर उंच झाडे असलेल्या रस्त्याने जाताना डासांचा डंख सोसावा लागतो. खांडस येथील काठेवाडी भागातून एक वाट भीमाशंकर अभयारण्यात जाते.