मुंबई : शिवस्मारक पायाभरणी कार्यक्रमासाठी गेलेल्या स्पीड बोटीला दुर्दैवी अपघात झाला. या दुर्घटनेत सिद्धेश पवार नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. पण, जर तो एक फोन झाला नसता तर मोठा अनर्थ घडला असता. कारण, या दुर्घटनेवेळी स्पीटबोटीत 25 प्रवाशी होते. घटनेचं गांभीर्य ओळखून बोटीवर असलेले महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे पीए श्रीनिवास जाधव यांनी शेकाप नेते आमदार जयंत पाटील यांना पहिला फोन केला. बोट दुर्घटनेबाबत माहिती सांगितली. त्यावेळी जयंत पाटील यांनी तात्काळ दोन बोटी बचावासाठी पाठवल्याने बोटीवरील 24 जणांचा जीव वाचला.
शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमास गेलेल्या स्पीडबोटीला अरबी समुद्रात अपघात झाला. या बोटीत विनायक मेटेंच्या शिवसंग्राम संघटनेचे 25 कार्यकर्ते होते. मात्र, या दुर्दैवी अपघातात सिद्धेश पवार नावाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. प्रसंगावधानता राखल्यामुळे सुदैवाने बोटीवरील इतर सर्वांचा जीव वाचला. बुधवारी दुपारी 3.30 च्या सुमारास बोट शिवस्मारकाच्या दिशेनं निघाली. मात्र, वाटेतच मोठ्ठा आवाज झाला अन् बोट जागेवरच थांबली. बोट अचानक थांबवल्यामुळे बोटीवरील सर्वचजण घाबरले. याबाबत बोटचालकास विचारणा केल्यानंतर, बोटचा मागील पंखा तुटल्याचे चालकाने सांगितले. मात्र, क्षणार्धात बोटीत पाणी शिरण्यास सुरुवात झाली. पण, घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आणि प्रसंगावधानता राखत श्रीनिवास जाधव यांनी शेकापचे आमदार जयंत पाटील यांना फोन करुन घटनेची माहिती दिली. पाटील यांनी तात्काळ दोन बोटी घटनास्थळी पाठवल्या. त्यावेळी, या बुडणाऱ्या बोटीतील कार्यकर्त्यांना दोन्ही बोटींवर सुखरुप पाठविण्यात आले. त्यामुळे 24 जणांचा जीव वाचला. शेकाप नेते जयंत पाटील यांना साधारण 4 वाजून 10 मिनिटांनी श्रीनिवास जाधव यांनी फोन केला. त्यानंतर झटपट हालचाली घडल्याने अन् जयंत पाटलांनी स्पीडली कृती केल्यानं बोटीवरील 24 जणांना जीवदान मिळाले.