- कुलदीप घायवटमुंबई : महाराष्ट्रातील पश्चिम घाटात आढळणारे दुर्मीळ फूल ‘शिवसुमन’ चेंबूर येथील टिळकनगर येथे फुलले. जगभरात फक्त महाराष्ट्रातील पश्चिम घाटात आढळून येणारे फूल चेंबूरमध्ये उगविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या फुलाचे आयुष्य एक दिवसाचेच असते.टिळकनगर येथील ट्रेकर तेजस लोखंडे यांनी तुंगा किल्ल्यावर भ्रमंती करताना ही वनस्पती तिथून आणली. त्यानंतर, या वनस्पतीला घरी नेऊन उत्तम वातावरणात वाढविली आणि शिवसुमन फूल फुलले. जुलै अखेरीस गडकिल्ल्यांवर ट्रेकिंगसाठी जाणार असून, त्यावेळी या वनस्पतीला पुन्हा तिच्या मूळ ठिकाणी लावणार असल्याचे लोखंडे म्हणाले.त्यांनी सागितले की, गडकिल्ल्यावर भ्रमंती करण्याची आवड असल्याने, १० मार्च रोजी तुंगा किल्ल्यावर ट्रेकिंग करताना गवतामध्ये एक वेगळी वनस्पती दिसली. ती दुर्मीळ आहे, याची कोणतीही कल्पना नव्हती. ही वनस्पती सक्युलेंट प्रकारात मोडते, हे फक्त माहिती होते. इंटरनेटवरून माहिती काढून ‘फ्रेरिया इंडिका’ वनस्पतीचे नाव आहे, असे समजून आले. या वनस्पतीला घरी नेऊन योग्य प्रकारच्या मातीच्या मिश्रणामध्ये लावण्यात आले. शेणखत आणि इतर खत टाकून रोज वनस्पतीची जोपासना केली. आठवड्यामध्ये नवीन फांद्या आणि पाने येऊ लागली. दोन महिन्यांनंतर या फांद्यांना कळी येऊन त्यातून फूल फुलले. वनस्पती तज्ज्ञ सहकाऱ्याकडून समजले की, हे दुर्मीळ ‘शिवसुमन’ फूल आहे.बोली भाषेत म्हणतात ‘शिंदळ’जगभरात फक्त महाराष्ट्रामध्ये ही वनस्पती आढळून येते.सह्याद्री पर्वतरांगामध्ये डोंगर उतारावर ही वनस्पती पाहायला मिळते. पुणे येथे शिवनेरी किल्ला, पुरंदर, जुन्नर, वज्रगड, मुळशी, डोंगरवाडी, रायगड येथे शिवथरघळ, अहमदनगर येथे रंधा धबधबा, नाशिक येथे त्र्यंबकेश्वर, अंजनेरी आणि सातारा येथे महाबळेश्वर, सज्जनगड अशा निवडक भागांत ही दुर्मीळ वनस्पती आढळून येते. स्थानिक बोलीभाषेत या वनस्पतीला ‘शिंदळ’, ‘माकुडी’ असे म्हटले जाते.
मुंबईमध्ये फुलले पश्चिम घाटावरील ‘शिवसुमन’ , दोन महिन्यांनंतर उमलले फूल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 7:21 AM