कौतुकास्पद! शिवाय धुळे या चार वर्षांच्या मुलाने केला जागतिक विक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 06:33 AM2022-12-20T06:33:32+5:302022-12-20T06:34:00+5:30
नोबेल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली नावाची नोंद.
मुंबई : शिवाय धुळे या मुलुंडमधील ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूलमधील चार वर्षांच्या विद्यार्थ्याने नुकतेच २००० रुबिक क्यूब्सच्या साह्याने मोझेक आर्ट बनवण्याचा नवा विश्वविक्रम रचला आहे. रुबिक क्यूबच्या मदतीने त्याने पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे मोझेक आर्ट बनवल्याबद्दल नोबेल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने सर्वात लहान क्यूबर म्हणून त्या नावाची नोंद केली गेली आहे.
‘पिक्सेल चॅलेंज २.०’ या उपक्रमात सहभागी होत शिवायने हा विक्रम केला आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रभू यांनी शिवायचा सर्वात तरुण क्युबर बनल्याबद्दल तसेच १२ मिनिटांच्या आत ८ क्यूब्स सोडवल्याबद्दल सन्मान केला. प्रभू यांचेही नाव रुबिक क्यूबसाठी चारवेळा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आले आहे.
अभ्यासाबरोबरच त्याच्या या आवडीला शिवायच्या पालकांचेही प्रोत्साहन लाभत आहे. त्याने यात अधिकाधिक गती मिळवावी, अशी त्यांची अपेक्षा आहे.
शाळेला अभिमान
आपल्या विद्यार्थ्याच्या यशाबद्दल मुलुंडच्या ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका सुनयना अवस्थी म्हणाल्या, इतक्या लहान वयात यश मिळवल्याबद्दल आम्हाला ‘शिवाय’चा प्रचंड अभिमान वाटतो.
‘शिवाय’ एक अत्यंत प्रतिभावान विद्यार्थी आहे. रुबिक क्यूबमध्ये त्याचे ज्ञान आणि त्याची आवड वाखाणण्याजोगी आहे.
आमच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयात पुढे जाण्यास त्यात अधिक प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन देणे, हा आमचा उद्देश आहे. ‘शिवाय’ त्यामुळे विद्यार्थ्यांमधील आकलन शक्ती सुधारते आणि आत्मविश्वास वाढीस लागतो, अशी प्रतिकिया त्यांनी दिली.
‘शिवाय’ चार वर्षांचा असल्यापासून रुबिक क्यूब सोडवतो आहे. सध्या तो पायरामिन्क्स, २x२, ३x३ मिरर आणि स्केब रुक्यूब असे पाच रुबिक क्यूब सोडवू शकतो. रुबिक क्यूबमधून मोझेक आर्ट बनवण्याची आपली आवड त्याला यापुढेही जपणार आहे, अशी प्रतिक्रिया त्याने दिली.