चर्नी रोडच्या कोळीवाडीत ‘शॉक’चे सावट
By admin | Published: May 22, 2016 02:28 AM2016-05-22T02:28:15+5:302016-05-22T02:28:15+5:30
घरात हाय व्होल्टेज वस्तूंचा (मायक्रोवेव्ह, ओव्हन, एसी, गिझर) वापर करताना शॉर्ट सर्किट होईल, या भीतीच्या सावटाखाली गेल्या सहा महिन्यांपासून १०५ कुटुंबे जीव मुठीत धरून जगत आहेत
मुंबई : घरात हाय व्होल्टेज वस्तूंचा (मायक्रोवेव्ह, ओव्हन, एसी, गिझर) वापर करताना शॉर्ट सर्किट होईल, या भीतीच्या सावटाखाली गेल्या सहा महिन्यांपासून १०५ कुटुंबे जीव मुठीत धरून जगत आहेत. चर्नीरोड पूर्वेकडील राऊत इस्टेट म्हणजेच कोळीवाडी येथील ‘९१ - जे’ इमारतीतील रहिवासी मुख्य मीटर बॉक्सची मेन केबल मोठी टाकण्यात यावी, म्हणून गेले २ महिने बेस्टच्या कार्यालयात वहाणा झिजवत आहेत. पण, ढिम्म बेस्ट प्रशासनाने याची अद्याप दखल घेतली नाही.
ही इमारत १३० वर्षे जुनी आहे. मुख्य मीटर बॉक्सला ‘७५ एमएम’ची वायर आहे. ती ७० ते ८० वर्षांपूर्वीची आहे. काळानुरूप घरातील विजेची उपकरणे वाढली आहेत. त्यामुळे प्रत्येक घरातील विजेचा लोडदेखील वाढला आहे. मुख्य वायर हा लोड सहन करू शकत नाही. त्यामुळे या इमारतीत वीज जाणे, मीटर बॉक्समध्ये शॉर्ट सर्किट होणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. मध्यरात्री वीज जात असल्यामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. बेस्टच्या पाठकवाडी कार्यालयाशी संपर्क साधल्यावर एक ते दीड तासाने वीज येते. पण, या वेळी जुजबी काम केले जाते. त्यामुळे रहिवाशांच्या डोक्यावर वीज जाण्याची अथवा शॉर्ट सर्किट होण्याची भीती कायम असल्याचे येथील रहिवासी सुनील चव्हाण यांनी सांगितले.
सध्या विजेच्या वापराचे प्रमाण पाहता असलेली वायर खूपच लहान आहे. त्यामुळे आता नवीन ३०० एमएमची वायर टाकावी यासाठी अनेकदा बेस्टशी संपर्क साधला आहे. पण, त्यांच्याकडून अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. आता पावसाळा तोंडावर आला आहे. पाऊस सुरू झाल्यावर बेस्ट खड्डे खणून काम करत नाही. त्यामुळे आत्ताच काम झाले नाही तर, या कामासाठी अजून चार महिने थांबावे लागणार आहे, असे रहिवासी श्रीहरी इंगळे यांनी सांगितले.
बेस्ट कर्मचारी येत नसल्यामुळे हा खड्डा तात्पुरता बुजवला आहे. पण, काम पुढेच सरकत नसल्यामुळे सर्व जण जीव मुठीत घेऊन जगत आहेत. कॉन्ट्रॅक्टरने काम करून घेण्यासाठी अडीच ते तीन लाखांची मागणी केली होती. आता याच इमारतीतील रहिवाशाने हे काम हाती घेतले आहे. पण, बेस्ट कार्यालयात फाईल अडकल्यामुळे सर्वच कामांचा खोळंबा होत असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)