६३२.५५ कोटी रुपये थकीत; बिल भरण्याकडे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महावितरणच्या भांडूप परिमंडळाकडून वारंवार आवाहन करूनही अनेक ग्राहक वीज बिल भरण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी वीज ग्राहकांकडील थकबाकीचा आकडा वाढत असून, आजघडीला भांडुप परिमंडळातील विविध वर्गवारीतील उच्चदाब व लघुदाब ग्राहकांकडे ६३२.५५ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
वीज ग्राहक महावितरणच्या संकेतस्थळावर, मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन वीज भरू शकतात. धनादेशाद्वारे भरणा केल्यास महावितरणच्या खात्यात रक्कम जमा होण्याची दिनांक, भरणा दिनांक म्हणून गृहीत धरली जाते. बँकेकडून धनादेश वटण्यास उशीर झाल्यास विलंब भरणा शुल्कचा भुर्दंड ग्राहकास बसू शकतो. धनादेश न वटल्यास चेक बाऊन्स शुल्क नियमाप्रमाणे आकारण्यात येतो. ऑनलाईन भरणा केल्यास ग्राहकास त्वरित त्याच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एसएमएसद्वारे पोहोच मिळते. संकेतस्थळावर पेमेंट हिस्ट्री तपासल्यास भरणा तपशील व पावती उपलब्ध होते.
* कोणी किती थकविले (काेटी रुपयांमध्ये)
उच्चदाब ग्राहकांची थकबाकी ४७.७३
घरगुती १७७.४८
व्यावसायिक १०६.९
औद्योगिक ८३.६५
पाणीपुरवठा योजना ७.०५
स्ट्रीट लाईट १९३.९४
इतर ग्राहक ११.१६
कृषीपंप ग्राहक ४.६५
..............................................