मुंबई : मुंबईकर वीज ग्राहक वीज दरवाढीच्या बोजाने दबले असतानाच दुसरीकडे तोट्यात असलेल्या बेस्टच्या वीज ग्राहकांना आता प्रीपेड मीटरचा शॉक बसणार आहे. प्रीपेड मीटरसाठीचे टेंडर पास झाले असून, त्यानुसार मुंबईत अदानी इलेक्ट्रिकल कंपनीची मीटर बसविली जाणार आहेत. मात्र, या प्रीपेड मीटरमुळे बेस्टच्या वीज ग्राहकांवर आर्थिक बोजा लादला जाणार आहे.
मुंबई शहराला वीजपुरवठा हा बेस्ट अंडरटेकिंगकडून होतो. मात्र, सप्टेंबर महिन्यापासून मुंबई शहरात अदानी इलेक्ट्रिकल कंपनीची मीटर बसविली जाणार आहेत. याचे टेंडर पास झाले आहे. ही ऑटोमॅटिक प्रीपेड मीटर असणार आहेत. ती सगळ्यांना बंधनकारक होतील. मीटरची किंमत ९,५०० रुपये आहे.
यातील १,३०० रुपये केंद्र सरकार देणार आहे. उरलेले पैसे हे बेस्ट अंडरटेकिंग देणार आहे. हे कॉन्ट्रॅक्ट जवळपास १,३०० कोटी रुपयांचे आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
काँग्रेसचा आक्षेप
ज्यांचे आयुष्य दर महिन्याच्या पहिल्या तारखेला येणाऱ्या पगारावर अवलंबून आहे, अशा लोकसंख्येला प्रीपेड मीटरचे बॅलन्स संपायला आल्यास त्याचा रिचार्ज करणे कसे शक्य होईल? ही ग्राहकांची लूट ठरेल आणि हे सगळे या कंपनीच्या फायद्यासाठी केले जात आहे.
वीज बिलांची प्रीपेड वसुली करून ही कंपनी बेस्ट प्रशासनाला देणार आहे. हे बेस्टच्या खासगीकरणाच्या दिशेने पाऊल आहे.
काँग्रेस पक्षाचा प्रीपेड मीटर कल्पनेला विरोध आहे. सामान्य मुंबईकरांवर आणला जाणारा हा मोठा आर्थिक बोजा आहे.