वीज कंपन्यांना शॉक; कोटयवधींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:06 AM2021-09-05T04:06:33+5:302021-09-05T04:06:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनामुळे सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले असतानाच दुसरीकडे वापरलेल्या वीजबिलाचे पैसे भरण्याइतपतही परिस्थिती नसल्याने अनेक ...

Shock to power companies; Arrears of crores | वीज कंपन्यांना शॉक; कोटयवधींची थकबाकी

वीज कंपन्यांना शॉक; कोटयवधींची थकबाकी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनामुळे सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले असतानाच दुसरीकडे वापरलेल्या वीजबिलाचे पैसे भरण्याइतपतही परिस्थिती नसल्याने अनेक ग्राहकांनी वीजबिले भरलेली नाहीत. त्यामुळे मुंबईत वीज पुरवठा करत असलेल्या वीज कपन्यांची थकीत वीजबिलाची रक्कम कोट्यवधींच्या घरात गेली आहे. यामुळे वीज कंपन्यांना एका अर्थाने ‘शॉक’च बसला आहे.

महावितरण मुंबईच्या भांडूप आणि मुलुंड परिसरात वीज पुरवठा करत आहे तर बेस्ट मुंबई शहरात वीज पुरवठा करत आहे. टाटा आणि अदानी या दोन वीज कंपन्यांकडून मुंबईच्या उपनगरात वीज पुरवठा केला जातो. कोरोना काळात या चारही वीज कंपन्यांनी ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी वाढीव मुदत दिली होती. शिवाय याद्वारे दिलासादेखील दिला होता.

कालांतराने वाढीव मुदत देऊन आणि सूट देऊनही अनेक ग्राहकांनी आपली वीजबिले भरलेली नाहीत. त्यामुळे वीज कंपन्यांचा थकीत वीजबिलांच्या रकमेचा आकडा वाढतच आहे.

महावितरणकडून प्राप्त माहितीनुसार, गेल्या वर्षभरापासून अनेक ग्राहकांनी वीजबिले भरलेली नाहीत. त्यामुळे थकीत वीजबिलांचा आकडा वाढला आहे. सर्वसाधारणरित्या गेल्या वर्षभराचा हा आकडा ५०० कोटी रुपये एवढा असून, वीजबिल वसुलीसाठी महावितरणने मोहीम हाती घेतली आहे.

टाटा पॉवरकडून प्राप्त माहितीनुसार, थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी ग्राहकांना सातत्याने माहिती दिली जाते, एसएमएस पाठवले जातात, टेलिकॉलिंग केले जाते. प्रत्यक्ष पाहणीदेखील केली जाते.

तसेच वेळ आली तर वीज पुरवठा खंडित करण्यासाठीची नोटीसदेखील पाठवली जाते. मात्र ग्राहकांना वीजबिल भरता यावे म्हणून ऑफलाईन आणि ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याद्वारे ग्राहक वीजबिल भरू शकतात. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाच्या आदेशाप्रमाणेच याबाबतची कार्यवाही केली जाते, असेदेखील टाटा पॉवरकडून सांगण्यात आले.

दरम्यान, याबाबत बेस्ट आणि अदानी या वीज कंपनीला विचारले असता त्यांनी मात्र माहिती दिली नाही.

दुसरीकडे चांगली तसेच अखंडित वीज सेवा देण्यासाठी वीज कर्मचारी नेहमी तत्पर असतात. मागील दोन वर्षांपासून अनेक विपरीत परिस्थितीला सामोरे जाऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना उत्तम सेवा दिली आहे. मात्र, त्यांच्या कामांना ग्राहकांकडून हवा तसा प्रतिसाद दिला जात नाही. त्यांना वीज सेवा देण्यासोबतच वीज वसुलीसाठी कसरत करावी लागत आहे.

आता वीजबिल वसुलीची जोरदार मोहीम सुरु असून, थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे.

वारंवार विनंती करूनही वीजबिल भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा नाईलाजाने खंडित करण्याची वेळ आली आहे. जे ग्राहक वीजबिलाची थकबाकी भरण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, अशा ग्राहकांच्या नावे दुसरी वीजजोडणी असल्यास त्या जोडणीवर थकबाकीची रक्कम टाकून वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांची दुसरी वीजजोडणीसुद्धा खंडित करण्याची कारवाई सध्या सुरु केली आहे. या परिस्थितीला टाळण्यासाठी ग्राहकांनी आपली वीजबिले भरावीत, असे आवाहन केले जात आहे.

कोरोनाच्या काळात वीजबिल वसुली मंदगतीने सुरु होती. ग्राहकांना टप्प्याटप्प्याने वीजबिल भरण्यासाठी मुभाही दिली होती. परंतु, अनेक ग्राहकांनी मार्च २०१९पासूनचे वीजबिल भरले नव्हते. वीजबिलांच्या वाढत असलेल्या थकबाकीमुळे आर्थिक स्थिती गंभीर झाली असून, वीज खरेदी, वीज यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्ती तसेच कर्मचाऱ्यांचे पगार या सर्व दैनंदिन खर्चासाठी वीजबिल वसुली करणे अत्यंत आवश्यक झाल्यामुळे नाईलाजाने वीज जोडणी खंडित करण्याची तीव्र मोहीम हाती घेण्यात आली आहे.

Web Title: Shock to power companies; Arrears of crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.