वीजग्राहकांना ‘शॉक’; बंद काळात प्रत्यक्षात वीजेचा वापर अत्यल्प असतानाही दुप्पट, चौपट, दहापट बिले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 06:20 PM2020-05-28T18:20:41+5:302020-05-28T18:21:12+5:30
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून उद्योग बंद आहेत. आणि या बंद काळातच दुप्पट, चौपट, दसपट बिले महावितरणने वीज ग्राहकांना धाडली आहेत.
मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून उद्योग बंद आहेत. आणि या बंद काळातच दुप्पट, चौपट, दसपट बिले महावितरणने वीज ग्राहकांना धाडली आहेत. यापैकी अनेक बिलांमध्ये चुका व गोंधळ आहेत. त्यामुळे संबंधित सर्व उच्चदाब ग्राहकांनी लेखी निषेध व तक्रार नोंद करून मगच ही बिले भरावीत, असे आवाहन महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष व वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी राज्यातील सर्व उच्चदाब औद्योगिक व अन्य सर्व ग्राहकांना केले आहे.
प्रताप होगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, वीज आयोगाने महावितरणला औद्योगिक, व्यावसायिक, सर्व उच्च दाब ग्राहकांचे बिलींग केव्हीएच युनिटस आधारे करण्यास मान्यता दिलेली आहे. त्यानुसार ग्राहकांना केव्हीएच युनिटस आधारे बिले पाठविली आहेत. प्रत्यक्षात नेहमीच्या वीजवापराच्या तुलनेने ही बिले अधिक आहेत. लॉकडाऊनमुळे उद्योग बंद होते. त्यामुळे योग्य काळजी घेणे, कपॅसिटर्स बंद ठेवणे इ. सर्व बाबी अशक्य होत्या. अजूनही योग्य तांत्रिक पूर्तता करणे शक्य नाही अशी, अवस्था आहे. त्यामुळे प्रत्यक्षात वीजेचा वापर अत्यल्प असतानाही नेहमीच्या दुप्पट, ५ पट, १० पट बिले आल्यामुळे ग्राहक हैराण आहेत.
------------------
- राज्यातील एकूण २ कोटी ७३ लाख वीज ग्राहकांपैकी फक्त २२ हजार ग्राहक हे उच्चदाब ग्राहक आहेत.
- तथापि या ग्राहकांकडून मिळणारा महसूल मात्र ४३ टक्के इतका मोठा आहे.
- यामध्ये बहुसंख्य म्हणजे १४ हजार ४०० ग्राहक औद्योगिक आहेत.
- चुकीच्या आकारणीमुळे ग्राहकांना दरमहा ५०० कोटी अतिरीक्त फटका बसण्याची शक्यता आहे.