मुंबई : महावितरणमधील कंत्राटी कामगारांचे पगार वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या असून, जळगावातून कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करण्याचे लोण आता मुंबईतही पसरण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
महावितरणच्या भांडूप परिमंडळात महिन्यापूर्वी कंत्राटी कामगारांना या अडचणीला सामोरे जावे लागल्यानंतर युनियनने मध्यस्थी केली आणि समस्या निकाली लागली. मात्र, आजही परिस्थिती फार काही चांगली नाही. त्यामुळे कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करण्याऐवजी त्यांना कौशल्याने सक्षम करावे, याकडे युनियनने लक्ष वेधले आहे.
वीज कंपन्यांना गरज होती तेव्हा त्यांनी भरती न करता कामगारांचे आऊट सोर्सिंग केले. यात वायरमनही आहेत. आता मध्येच या सरकारने म्हटले की कौशल्य असलेले कामगार हवेत. आयटीआय पाहिजे, असे म्हणत काही ठिकाणी नोटीस देण्यात आल्या.
सण, उत्सव साजरे कसे करणार ?आता दसरा आणि दिवाळी आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर कंत्राटी कामगारांनी कोणाकडे बघावे ? असा सवाल केला जात आहे.
पीएफ भरले जात नाहीत कंत्राटदार पीएफच्या नावाने पैसे घेतात. पीएफ भरत नाहीत. जो पगार मिळतो त्यातूनही कपात केली जाते. जळगाव येथून कामावरून काढण्याची सुरुवात झाली. मुंबई, ठाणे आणि परिसरात ही स्थिती निर्माण होऊ शकते.
आयटीआय नसल्याने कामावरून काढण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. या कामगारांना बारा ते पंधरा वर्षे झाली आहेत. त्यांचे वयदेखील झाले आहे. अशावेळी अटी मागितल्या तर चुकीचे होईल.
राज्यामध्ये तिन्ही वीज कंपन्यांमध्ये मिळून सुमारे ३२ हजार कंत्राटी कामगार आहेत. १ हजार ते दीड हजार कंत्राटी कामगारमहावितरणचे १६ झोन आहेत. प्रत्येक झोनमध्ये १ हजार ते दीड हजार कंत्राटी कामगार आहेत.
सरकारने आता ठरावीक नऊ संस्था दिल्या आहेत. या नऊ संस्थांकडूनच आऊट सोर्सिंग करायचे, असे सांगण्यात आले आहे. महावितरणच्या भांडूप परिमंडळात महिन्याभरापूर्वी ही अडचण झाली होती. आम्ही ही अडचण सोडविण्यासाठी भांडूप परिमंडळात दाखल होत होतो. आमचे म्हणणे हेच आहे की कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करण्याऐवजी त्यांना कौशल्याने सक्षम करावे.- राकेश जाधव, उपाध्यक्ष व मुख्य प्रवक्ते, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय वीज कामगार फेडरेशन, इंटक