Join us

उद्धव ठाकरेंना धक्का, वायकर शिंदेंच्या सेनेत; भास्कर जाधव नाराज, निरुपमही घेणार भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 6:02 AM

विशेष म्हणजे आदल्याच दिवशी गोरेगाव येथे उद्धव ठाकरे यांचे रवींद्र वायकर यांनी स्वागत केले होते. दुसऱ्या दिवशीच त्यांचे पक्षांतर झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम होण्याआधीच घटक पक्षांत पडझड सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मानले जाणारे आमदार रवींद्र वायकर यांनी रविवारी सायंकाळी शिंदे गटात प्रवेश केला. ठाकरे गटासाठी हा धक्का मानला जात आहे. 

ठाकरे गटाचेच दुसरे नेते आमदार भास्कर जाधव यांनी चिपळूणमधील सभेत बोलताना पक्षात मिळणाऱ्या वागणुकीवरून नाराजी व्यक्त केली आहे. अशात ठाकरे यांनी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी संताप व्यक्त केला आहे. यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काठावर आलेल्या आपल्या नेत्यांना आवरायचे कसे याचा मोठा पेच महाविकास आघाडीतील पक्षनेतृत्वासमोर निर्माण झाला आहे.

विशेष म्हणजे आदल्याच दिवशी गोरेगाव येथे ठाकरे यांचे वायकर यांनी स्वागत केले होते. दुसऱ्या दिवशीच त्यांचे पक्षांतर झाले. हा पक्षप्रवेश होण्याआधी मुंबई महापालिकेने त्यांच्याविरोधातील आरोप मागे घेतले.

कमिशनचा हिस्सा मिळाला म्हणून उमेदवारी : निरुपम

ठाकरे यांनी शनिवारी अंधेरी येथील एका कार्यक्रमात उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे संतापलेल्या संजय निरुपम यांनी कोरोना काळातील गरिबांच्या खिचडी वाटप घोटाळ्यातील आरोपीची उमेदवारी जाहीर करण्याची घाई का? असा सवाल एक्स या समाज माध्यमातून केला. तर पत्रकार परिषद घेत कमिशनचा हिस्सा पोहोचल्यानेच कीर्तिकरांना उमेदवारी दिली असा आरोप निरुपम यांनी ठाकरे गटावर केला आहे.

उशाजवळ साप ठेवून झोपू शकत नाही : भास्कर जाधव

पक्षातील वागणुकीवरून ठाकरे गटाचे नाराज नेते भास्कर जाधव यांनी चिपळुणात रविवारी स्नेहमेळावा घेत नाराजी व्यक्त केली. माझी लढाई वैयक्तिक नाही, तर पक्षासाठी आहे; परंतु उशाजवळ साप ठेवून मी झाेपू शकत नाही. पक्षातीलच काही जण माझ्या विरोधात षडयंत्र रचताहेत. स्वतः निष्ठेच्या गोष्टी सांगायच्या  आणि पक्षात राहून पक्षाचीच वाट लावायची ही वृत्ती घातक आहे, अशा शब्दांत जाधव यांनी पक्षांतर्गत विरोधकांचा समाचार घेतला. सर्वांचा हिशेब चुकता केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला. 

वायकर यांनी बाळासाहेबांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. ज्या मतदारांनी आपल्याला निवडून दिले त्यांचे प्रश्न सोडविणे हे अपेक्षित असते. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री. 

टॅग्स :शिवसेनाएकनाथ शिंदेरवींद्र वायकरलोकसभा निवडणूक २०२४