मुंबई : अतिरिक्त कॅल्शिअमची पातळी असल्यामुळे हृदयविकारांच्या शस्त्रक्रियांमध्ये गुंतागुंत होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे हृदयातील रक्त वाहिन्यांमध्ये साठलेले हे अतिरिक्त कॅल्शिअम काढण्यासाठी दादरच्या शुश्रूषा रुग्णालयात शॉक व्हेव थेरपी उपलब्ध करून देण्यात आली. नुकतेच या माध्यमातून ज्येष्ठ रुग्णावर पहिली शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्याची माहिती शुश्रूषा रुग्णालय प्रशासनाने दिली. अशा स्वरूपाची उपचारपद्धती उपलब्ध असलेले शुश्रूषा हे मुंबईतील एकमेवर रुग्णालय आहे.
शुश्रूषा रुग्णालयातील ज्येष्ठ हृदयविकारततज्ज्ञ डॉ. राजीव भागवत यांच्या नेतृत्वाखाली ही शस्त्रक्रिया पार पडली. यावेळी ८१ वर्षीय महिलेला या उपचारपद्धतीने हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले अतिरिक्त कॅल्शिअम काढून टाकण्यात आले, तसेच त्या ठिकाणी स्टेंट टाकण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देण्यात आली. जेणेकरून, यामुळे शस्त्रक्रियेनंतरचा त्रासही आटोक्यात आणता येतो, अशी माहिती डॉ. भागवत यांनी दिली.
या उपचारपद्धतीत ब्लॉक निदान झालेल्या ठिकाणी वायरच्या मदतीने फुगा घातला जातो. हा विशेष फुगा असून, त्यात ज्या ठिकाणी कॅल्शिअम साचलेले असते, तिथे या फुग्याला फुगविले जाते. त्या माध्यमातून अल्ट्रा साउंड लहरी निर्माण करून तीव्र क्षमतेमुळे साचलेले कॅल्शिअम काढून टाकले जाते, असे डॉ. भागवत यांनी सांगितले.
रुग्णाची माहिती देताना डॉ. भागवत म्हणाले, ८१ वर्षीय महिला रुग्णावर एक वर्षापूर्वी अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यावेळी तीन स्टेंट टाकण्यात आले होती. यावेळी त्या स्टेंटच्या खाली नवीन ब्लॉकचे निदान झाले होते, त्याने वेदनाही होत होत्या. त्यामुळे अँजिओप्लास्टी करताना अतिरिक्त कॅल्शिअममुळे स्टेंट पुरेसे उघडले नसल्याचे दिसल्याने, या उपचारपद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही उपचारपद्धती ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक उपयुक्त व कमी वेदनादायी आहे. मात्र, अन्य वयोगटांतील रुग्णांवरही ही उपचारपद्धती अवलंबिता येते.
अधिष्ठाता डॉ. शिल्पा देशमुख यांनी सांगितले की, शुश्रूषामध्ये सामान्यांच्या आवाक्यात असणारी ही उपचारपद्धती उपलब्ध झाली आहे. सरकारी व खासगी रुग्णालयांपैकी ही अत्याधुनिक उपचारपद्धती उपलब्ध असलेले शुश्रूषा पहिले रुग्णालय आहे. सामान्य रुग्णांच्या दृष्टिकोनातून जास्तीतजास्त आरोग्यविषयी सोईसुविधा सामान्यांना देण्यासाठी हे रुग्णालय कटिबद्ध आहे.