मुंबई - राज्याच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्याविषयीच चर्चा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून पायउतार होत निवृत्तीची घोषणा केली. याशिवाय राज्यसभेची टर्म संपली की निवडणूक लढवणार नाही, असेही जाहीर केले. शरद पवार यांच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आता शरद पवार यांच्या कुटुंबातून, स्नेही मंडळींकडूनही यावर मत नोंदवले जात आहे. शरद पवार यांच्या बहिणी सरोज पाटील यांनीही यावर आपल मत मांडलं. या निर्णयामुळे मलाही धक्काच बसला, पण हा निर्णय योग्य मानून आपण शुभेच्छा दिल्या पाहिजेत, असे त्यांनी म्हटले. लोकमत व्हिडीओचे संपादक आशिष जाधव यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केले.
मी इस्लामपूरला होते, तेव्हा जयंत पाटील यांचे कार्यकर्ते पळत आले. ते माझ्यासमोर रडायला लागले, तेव्हा मला शरद पवार यांनी केलेल्या निवृत्तीच्या घोषणेबाबत समजले. माझ्यासाठीही हा धक्का देणाराच निर्णय होता, असे म्हणत शरद पवार यांच्या बहिण आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या राज्याध्यक्ष सरोज पाटील यांनी शरद पवारांच्या निर्णयावर आपलं मत मांडलं. कोणतीही संस्था टिकायची असेल तर आपल्यानंतर तेथे सक्षम असे सेवक असायला हवेत. निस्वार्थी माणसं असली पाहिजेत. अशातच शरद पवार हे पुढील ३ वर्षे काम करू शकतील. त्यामुळे, आत्ताच त्यांनी अध्यक्ष पदावर योग्य व्यक्ती बसवली तर पुढील ३ वर्षात तो तयार होईल. शरद बाबतचं माझं दु:ख कमी झालं, म्हणूनच मला हा निर्णय योग्य वाटतोय.
माणसं हेच शरद पवारांचं औषध
कर्करोगासारख्या भयानक आजाराशी झुंजत शरद आजपर्यंत जगला. कारण, माणसं हेच त्याचं औषध आहे, माणसं आली की त्याला आनंद होतो. पण, अध्यक्षपदावरुन गेल्यानंतर माणसं त्याला कमी दिसतील का, अशीही भीती माझ्या मनात होती. आजही मला त्याचं लहानपण आठवतोय, तो लहानपणी सतत मित्रांच्या गराड्यात असायचा. आम्ही म्हणायचो आमचा भाऊ वाया गेला, रात्री उशिरापर्यंत तो पोरांसोबतच असायचा. शाळेतील क्रीडा महोत्सवात त्याच्याशिवाय मैदानच भरत नसायचं. लहानपणी भोपळे विकायलाही तो जायचा. खूप कष्टातून आमची ही भावडं आज इथपर्यंत पोहोचली आहेत, अशा आठवणी सरोज पाटील यांनी जागवल्या.
शरद पवार काहीही झालं तरी माणसांत रमणारा माणूस आहे. त्यामुळे, ते पुढील ३ वर्षेही वेगळ्या कामातून माणसांत राहतील, लोकांच्या सेवेसाठी, लोकांच्या दु:खात धावून जातील. म्हणूनच त्यांचा हा निर्णय मला योग्य वाटतो. आता, आपण रडत न बसण्यापेक्षा त्यांना शुभेच्छा द्यायला हव्यात, असेही सरोज पाटील यांनी म्हटले.
शरद पवारांच्या मित्रानेही म्हटलं, योग्य निर्णय
आता शरद पवार यांनी पूर्ण विचार करून निर्णय घेतला असणार. कार्यकर्त्यांना मनावर दगड घेऊन तो स्वीकारावा लागू शकेल, असे शरद पवार यांच्या खास मित्रांनी म्हटले आहे. शरद पवार यांचे खास मित्र असलेले विठ्ठल मणियार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवृत्तीच्या निर्णयाबाबत ते म्हणाले की, शरद पवारांनी घेतलेला निर्णय धक्कादायक वाटणे स्वाभाविक आहे. कारण एखादी अनपेक्षित घडली की ती आपल्याला धक्कादायक वाटते. मात्र, त्यांनी घेतलेला निर्णय अचानकपणे घेतला, असे वाटत नाही. या निर्णयाचा परिणाम पक्षसंघटनेवर आणि इतर अनेक गोष्टींवर होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी पूर्णपणे विचार करूनच हा निर्णय घेतला असावा, असे मणियार यांनी म्हटले.