मुंबई : घरातून प्रोटीन, अंडी खाऊन तरुणाने जीम गाठले. जीममध्ये डम्बल्सचे दोन सेट मारल्यानंतर अवघ्या ४ मिनिटांतच तो खाली कोसळला. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी डोंगरीत घडली. अलीम हसन रजा पंजवानी (१८) असे मृत तरुणाचे नाव आहे.
डोंगरी येथील दारुल अमीन इमारतीत पंजवानी हा तरुण कुटुंबीयांसोबत राहायचा. डोंगरी येथील सद्गुरू फिटनेस जीममध्ये गेल्या सहा महिन्यांपासून व्यायामासाठी जात आहे. शुक्रवारी सकाळी ९.१५ च्या सुमारास त्याने जीम गाठले. जीममध्ये डम्बेल्सचे दोन सेट मारताच तो चक्कर येऊन खाली कोसळला. सहकाऱ्यांनी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीच प्रतिसाद न आल्याने त्याचे फॅमिली डॉक्टर फारुख झवेरी यांना तेथे बोलावून घेतले. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित करताच सर्वांनाच धक्का बसला. शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात त्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे त्यांच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यात, इस्केमिक हृदयरोग आणि उच्च रक्तदाबामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले होते.आनुवंशिक आजारही कारणीभूतअनेकदा मुलांना आनुवंशिकच हृदयाचा आजार असतो. हृदयासंबंधित कुठलीही समस्या जाणवत असल्यास संबंधिताने तत्काळ हृदयरोग तज्ज्ञांची मदत घ्यायला हवी. त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. व्यायाम करतानाही योग्य खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले.मुंब्रा येथे बॉडीबिल्डर तरुणाचा मृत्यूजानेवारीमध्ये मुंब्रा येथेदेखील शरीरसौष्ठव स्पर्धेत भाग घेण्यासाठी तयारी करीत असलेल्या नावेद जामीन खान (२३) या जीम ट्रेनरचा स्टेरॉईडच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाला होता.