Join us

धक्कादायक ! दिवसभरात २० हजार ४८९ रुग्ण, आजपर्यंतच सर्वाधिक रुग्णसंख्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 9:02 PM

दैनंदिन रुग्णनिदानाचा आलेख चढताच, २ लाख २० हजार सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु

ठळक मुद्देराज्यात पाच दिवसांत ९१ हजार नवे कोरोनाचे रुग्ण

मुंबई – ऑगस्ट महिन्यात काही प्रमाणात नियंत्रणात आलेल्या राज्यातील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. सप्टेंबरच्या पहिल्या पाच दिवसांत राज्यातील दैनंदिन रुग्णवाढ हजारांच्या टप्प्यात वाढली आहे. १ ते ५ सप्टेंबर या कालावधीत राज्यात तब्बल ९१ हजार १० रुग्णांची नोंद झाली असून ही अत्यंत चिंताजनक स्थिती आहे. राज्यात शनिवारी पुन्हा एकदा २० हजार ४८९ रुग्ण निदानाची नोंद झाली असून ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे. तर दिवसभरात ३१२ मृत्यू झाले असून एकूण बळींची संख्या २७ हजार २७६ झाला आहे. सध्या २ लाख २० हजार ६६१ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.०१ टक्के झाले असून मृत्यूदर २.९७ टक्के आहे. दिवसभरात नोंद झालेल्या ३१२ मृत्यूंमध्ये मुंबई ३३, ठाणे ९, ठाणे मनपा २, नवी मुंबई मनपा ४, कल्याण डोंबिवली मनपा १, भिवंडी निजामपूर मनपा २, मीरा भाईंदर मनपा ४, पालघर २, वसई विरार मनपा २, रायगड ५, पनवेल मनपा ४, नाशिक १०, नाशिक मनपा ५, मालेगाव मनपा १, अहमदनगर ८, अहमदनगर मनपा ७, धुळे ४, धुळे मनपा १, जळगाव ६, जळगाव मनपा १, नंदूरबार १, पुणे ५, पुणे मनपा ३२, पिंपरी चिंचव मनपा ७, सोलापूर ७, सोलापूर मनपा १, सातारा १३, कोल्हापूर १५, कोल्हापूर मनपा ३, सांगली ५, सांगली मिरज कुपवाड मनपा ६, रत्नागिरी २, औरंगाबाद मनपा ९, जालना ३, परभणी २, परभणी मनपा १, लातूर ६, लातूर मनपा १, उस्मानाबाद ६, बीड ४, नांदेड ७, नांदेड मनपा ८, अकोला २, अकोला मनपा १, नागपूर ४, नागपूर मनपा २७, वर्धा ४, भंडारा ४, चंद्रपूर ३, चंद्रपूर मनपा ३ आणि अन्य राज्य/ देशातील दोन रुग्णांचा समावेश आहे.

पुण्यात शनिवारी सर्वाधिक रुग्ण आढळून आले, ही संख्या पुणे क्षेत्रात १ हजार ३४५ तर पुणे मनपा क्षेत्रात २ हजार ३६६ इतकी होती. तर राज्यातील चार जिल्ह्यांत म्हणजे मुंबई, पुणे, पुणे मनपा आणि नागपूर मनपा क्षेत्रांमध्ये हजारांहून अधिक रुग्ण दिवसभरात आढळले आहेत. राज्यात पुण्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण असून ही संख्या ५७ हजार ७७१ इतकी आहे. त्याखालोखाल ठाण्यात २३ हजार तर मुंबईत २२ हजार सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत दिवसभरात १ हजार ७३७ रुग्ण आणि ३३ मृत्यू झाले आहेत. परिणामी, शहर उपनगरात कोरोना बाधितांची संख्या १ लाख ५३ हजार ७१२ झाली असून मृतांचा आकडा ७ हजार ८३२ झाला आहे. आतापर्यंत १ लाख २२ हजार ५६६ रुग्ण कोविडमुक्त झाले असून सध्या २२ हजार ७९८ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

राज्यात दिवसभरात १० हजार ८०१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ६ लाख ३६ हजार ५४७ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४५ लाख ५६ हजार ७०७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९.३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४ लाख ८१ हजार ९०९ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ३७ हजार १९६ व्यक्ती संस्थात्मक अलगीकऱणात आहेत.

३३ हजारांहून अधिक बालकांना संसर्ग

मागील काही दिवसात पुन्हा एकदा राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अहवालानुसार, नवजात बालक ते १० वर्षापर्यंतच्या तब्बल ३३ हजारांहून अधिक बालकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सध्या ही रुग्णसंख्या ३३ हजार ८४३ असून एकूण रुग्णसंख्येत हे प्रमाण ४.०० टक्के एवढे आहे. तर ११ ते २० वयोगटातील प्रौढ रुग्णांची संख्या ६० हजार ५६६ असून एकूण रुग्णसंख्येत हे प्रमाण ७.१६ टक्के इतके आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबईमहाराष्ट्रराजेश टोपेमृत्यू