धक्कादायक... महावितरणचे ग्राहकांकडे 73,00,00,00,361 रु. थकले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 11:50 AM2023-02-17T11:50:56+5:302023-02-17T11:51:22+5:30
महावितरणच्या १५ लाख ग्राहकांची वीजबिल भरण्याकडे पाठ
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महावितरणकडून सवलतीच्या दरात वीजपुरवठा होत असतानाच राज्यातील १५ लाख १९ हजार कृषिग्राहकांनी गेली पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ एकही बिल भरलेले नाही. त्यांच्याकडे २१,०६७ कोटी रुपये थकबाकी आहे. त्यापैकी ३ लाख २३ हजार असे कृषिपंपधारक ग्राहक आहेत, ज्यांनी गेली पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ एकही वीजबिल भरलेले नाही. त्यांच्याकडे ५,२१६ कोटी रुपयांची थकबाकी असून, आता वीजग्राहकांची बिलांची थकबाकी ७३,३६१ कोटींवर गेली आहे.
महावितरणच्या उत्पन्नापैकी ८० टक्के रक्कम वीज खरेदीवर खर्च होते. २०२१ -२२ वर्षात वीज खरेदीपोटी ६९,४७८ कोटी रुपये खर्च झाले होते. परिणामी वीजपुरवठा चालू ठेवण्यासाठी बिलांचे उत्पन्न हा उपाय असून घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक व कृषिग्राहकांनी बिले भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केले आहे.
ते बिल भरता, मग हे का नाही ?
काही ग्राहक मोबाइल बिल, डीटीएचचे बिल, केबलचे बिल अशी बिले नियमित भरत असताना त्यांच्यासाठी अत्यावश्यक सुविधा असलेले विजेचे बिल भरण्यास टाळाटाळ करतात हे आश्चर्यकारक असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे.
वीज मोफत नाही
महावितरण ग्राहक असून इतरांकडून वीज खरेदी करून ग्राहकांना पुरवते. महावितरण स्वतः वीजनिर्मिती करत नाही. कंपनीला कोणाकडून मोफत वीज मिळत नाही.