Join us

धक्कादायक! बँकेतच होतेय नोटांची अदलाबदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:08 AM

मुंबई : ठगांकडून बँकेतच नोटांची अदलाबदल होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. अँँटाप हिल येथे भारतीय नौदलातील ऑटो ...

मुंबई : ठगांकडून बँकेतच नोटांची अदलाबदल होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. अँँटाप हिल येथे भारतीय नौदलातील ऑटो इलेक्ट्रिशियन पदावर कार्यरत असलेल्या ५० वर्षीय जवानाची अशाच प्रकारे खराब नोटा आल्याचे सांगून हातचलाखीने २० हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी अँटाप हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अँँटाप हिल परिसरात भरत चव्हाण (५०) हे कुटुंबीयांसोबत राहण्यास आहेत. ते भारतीय नौदलात ऑटो इलेक्ट्रिशियन या पदावर काम करतात. २ जुलै रोजी दुपारी १२ वाजता ते पत्नीसह जवळच्या बँकेत पैसे काढण्यासाठी गेले. त्यांनी ९० हजार रुपये काढले. तेथेच बसून पैसे मोजत असताना एक इसम तेथे धडकला. त्याने काही नोटा खराब असल्याचे सांगून तपासून देण्याच्या बहाण्याने पैसे स्वतःकडे घेतले. त्याच वेळी दुसरा साथीदार तेथे उभा होता. त्यानंतर पैसे बघून ते चव्हाण यांच्याकडे सोपवून तो निघून गेला. त्यापाठोपाठ त्याचा साथीदारदेखील बाहेर पडला.

त्यांनी पुन्हा पैसे तपासले असता, त्यातून २० हजार ५०० रुपये कमी असल्याचे दिसून आले. यात फसवणूक झाल्याने त्यांनी बँक अधिकाऱ्यांना याबाबत सांगितले. अँँटाप हिल पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून बँकेतील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस तपास करीत आहेत.

ठगांपासून सावधान...

बँकेत अशाप्रकारे ‘नोटा खराब आहेत’, ‘बनावट नोटा आल्या आहेत’ असे सांगून पैसे मोजून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी कार्यरत आहे. त्यामुळे अनोळखी व्यक्तीची मदत घेऊ नका. काही संशय असल्यास थेट बँक कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. यात ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.