Join us

धक्कादायक! अर्भक विक्रीच्या रॅकेटमध्ये डॉक्टर, इंजिनीअर, साडेचार लाख रुपयांना विकत घेतली गरीबांची मुले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2017 2:48 PM

मागच्या महिन्यात वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांनी नवजात अर्भकांची विक्री करणा-या एका रॅकेटचा पदार्फाश केला होता.

ठळक मुद्देमुल जन्माला घातल्यानंतर त्यांना सांभळण्याची कुवत नसते अशा पालकांकडून ही मुले विकत घेतली जातात.तिने पुढचा व्यवहार करण्याआधीच पोलिसांनी तिला अटक केली.

मुंबई - मागच्या महिन्यात वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांनी नवजात अर्भकांची विक्री करणा-या एका रॅकेटचा पदार्फाश केला होता. या प्रकरणाच्या तपासातून नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार मुलांच्या खरेदी-विक्रीच्या या व्यवहारात डॉक्टर, इंजिनीअरचाही समावेश आहे.  डॉक्टर, इंजिनीअरची समाजातील प्रतिष्ठितांमध्ये गणना होते. वरळी येथील डॉक्टर, बंगळुरुतील सॉफ्टवेअर इंजिनीअर आणि ठाण्यातील प्रसूतीरोग तज्ञ असलेल्या एका जोडप्याने प्रत्येकी चार ते साडेचार लाख रुपये मोजून तीन नवजात अर्भके विकत घेतली. 

मुल जन्माला घातल्यानंतर त्यांना सांभळण्याची कुवत नसते अशा पालकांकडून ही मुले विकत घेतली जातात. पोलिसांनी या प्रकरणी मुले विकणा-या आणि मुलांची खरेदी करणा-या पालकांची जबानी नोंदवून घेतली. वडाळा ट्रक टर्मिन्स पोलिसांनी मागच्या महिन्यात वरळी येथे राहणा-या ज्युलिया फर्नांडिसला (29) अटक केल्यानंतर नवजात अर्भकांची विक्री करणा-या या रॅकेटचा पदार्फाश झाला. 

तिने मुन्ना शेख (38) आणि शाझिया (35) यांच्याकडून त्यांचे सात दिवसांचे मूल फक्त वीस हजार रुपयांना विकत घेतले. ज्युलिया हे मूल दीड लाख रुपयांना विकणार होती. तिने पुढचा व्यवहार करण्याआधीच पोलिसांनी तिला अटक केली. पोलिसांनी ज्युलियाकडून हे मूल ताब्यात घेऊन चाईल्डकेअर सेंटरमध्ये पाठवले. या मुलाचा सांभाळ करणा-यांनी त्याला अधिराज हे नाव दिले आहे. 

मुलाचे वडील मुन्ना शेखला पोलिसांनी अटक केली आहे. आपल्या डोक्यावर 1 लाख रुपयांचे कर्ज होते. या कर्जाची परतफेड करण्यासाठी मुलाची विक्री केली असे मुन्ना शेखने पोलिसांना सांगितले. बंगळुरु येथील एका सॉफ्टवेअर इंजिनीअरने ज्युलियाकडून साडेचार लाख रुपयांना मूल विकत घेतले. ठाणे येथील डॉक्टर जोडप्याने तिला चार लाख रुपये दिले होते. वरळी येथील डॉक्टरने किती रक्कम दिलेली ते पोलिसांनी उघड केले नाही. वरळी येथील डॉक्टरला मूलबाळ नसल्याने त्यांनी ज्युलियाकडून मूल विकत घेतले. 

ज्युलिया या डॉक्टरची पेशंट असल्याने हा व्यवहार खूप कमी किंमतीला झाला असे सूत्रांनी सांगितले. भारतात मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया किचकट असल्याने प्रतिक्षायादी खूप मोठी आहे. ज्युलियाच्या खात्यात एकही पैसा सापडला नाही असे पोलिसांनी सांगितले. या रॅकेटमध्ये सक्रीय असलेल्यांना पकडण्यासाठी पोलिसांची पथके बंगळुरु आणि नवी दिल्ली येथे गेली आहेत. तपासकर्त्या पोलिसांना मुलांचे 50 ते 60 फोटो सापडले. त्या मुलांची ओळख आणि कुठे त्यांची विक्री झाली ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.  

टॅग्स :नवजात अर्भकमुंबई