मुंबई - एखाद्या समाजाला किंवा व्यक्तीला वाळीत टाकणं, गावातून हाकलून देणं, किंवा गावासमारंभात सहभागी न करून घेणं हे प्रकार सर्रास ग्रामीण भागात घडल्याचं ऐकायला किंवा वाचायला मिळतं. बहुतांश खाप पंचायतींकडून याबाबतचा निर्णय घेत कायद्याचा अवमान केला जातो. मात्र, आता चक्क देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतशिवसेना नेत्यांनीच एका कुटुंबाला वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवसेना उपविभाग प्रमुख आणि शाखा प्रमुखाने मोकल कुटुंबाला वाळीत टाकलं असून आता पीडित कुटुंबाने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंकडे न्याय मागितला आहे.
देशाची आर्थिक राजधानी आणि सुशिक्षितांचे शहर असलेल्या मुंबईत ग्रामस्थ मंडळाकडून कुटुंबाला वाळीत टाकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ग्रामस्थांच्या बैठकीत न आल्याने या कुटुंबाला वाळीत टाकण्यात आलं आहे. बोरिवली पश्चिममधील श्री. गावदेवी ग्रामस्थ मंडळ, शिंपोली यांनी हा धक्कादायक ठराव केला आहे. विकी मोकल आणि त्यांच्या कुटुंबियांना सार्वजनिक कार्यक्रमात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. गावातील कोणाच्याही सुखदुःखात सहभागी होण्यासही मज्जाव आहे. तसेच, गावदेवीच्या दर्शनाला जाणे आणि पालखीला दाराजवळ ठेवण्यासही त्यांना मनाई करण्यात आली आहे. पीडित कुटुंबाने यासंदर्भात आता शासन दरबारी न्यायाची मागणी केली आहे.
विकी मोकल यांनी सामाजिक न्याय मंत्र्यांकडे आणि पोलिसात तक्रार दिली असून न्यायाची मागणी केली आहे. मोकल यांच्या सुनेने यापूर्वी दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी ग्रामस्थ मंडळाचा कुटुंबावर दबाव होता, असे पत्रात म्हटले आहे. तसेच, शिवसेनेचे बोरिवली उप विभागप्रमुख दामोदर म्हात्रे आणि शाखा प्रमुख सुनील पाटील यांच्या सांगण्यावरुनच वाळीत टाकण्यात आल्याचे मोकल कुटुंबीयांनी तक्रारीत म्हटले आहे.