मुंबई – कोरोनाचे खरेखुरे लढवय्ये असणाऱ्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. मात्र त्यांनाही विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. परिणामी, शासकीय व पालिका रुग्णालयांत सेवा देणारे निवासी डॉक्टर या कोरोनाच्या सावटामध्ये आहेत. विमानतळ आणि रुग्णालयांमध्ये सेवा देणाऱ्या पाच डॉक्टर कोरोना संशयित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र महाराष्ट्र निवासी डॉक्टर राज्यव्यापी संघटनेने ही बाब फेटाळली आहे.
त्याचप्रमाणे, कोरोनाच्या चमूमध्ये सेवा देणाऱ्या निवासी डॉक्टरांना मास्कचीही उपलब्धता नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे एकच मास्कच चार दिवस वापरण्याची वेळ या निवासी डॉक्टरांवर आली आहे. याविषयी, मार्ड संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे , पीपीई किट्स आणि अत्यावश्यक मास्कचा तुटवडा आहे. शिवाय, उपचार करणारे डॉक्टर्स आणि निवासी डॉक्टर्स त्यांच्या सोबत काम करणारे कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी एकच मास्क तीन ते चार दिवस वापरत आहेत.
तसेच अनेक रुग्णालयांमध्ये या तुटवड्याचा सामना करत आहेत. शिवाय जे डॉक्टर्स कस्तुरबा रुग्णालय आणि विमानतळावर कार्यरत होते त्यापैकी काही डॉक्टरही करोना संशयित आहेत. काही रुग्णालयांमध्ये डॉक्टरांना जेवणाच्या समस्येला ही सामोर जावे लागत आहे. त्यामुळे या गोष्टींसह रुग्णालयांमधील डॉक्टरांना मास्क आणि सुरक्षेचे सर्व साहित्य पुरवावे जेणेकरून डॉक्टर्स आणखी चांगली सेवा देऊ शकतील.