संतापजनक ! सुखाने मरताही आले नाही, कुजलेल्या अवस्थेत मृतदेह नातेवाईकांना सोपवला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 03:22 PM2020-05-20T15:22:36+5:302020-05-20T15:23:13+5:30
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिस वाढत आहे. काहीही केले तरी यावर नियंत्रण मिळवणे शक्य होताना दिसत नाही, अशात आता एक घटना समोर आली आहे.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २५ मार्चपासून देशात लाॅकडाऊन लागू करण्यात आला. सध्या या लाॅकडाऊनचे चौथे चरण चालु आहे. या काळात रेल्वे व सार्वजनिक वाहतूक सेवा बंद आहे. त्यामुळे रोजगारासाठी परप्रांतात गेलेल्या मजुरांनी मिळेल त्या वाहनांनी किंवा पायी आपले मूळ गाव गाठण्याचा प्रयत्न केला. अशात अनेकांच्या वाट्याला केवळ संघर्षच आला, तर कुणी थेट मृत्युमुखी पडली. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिस वाढत आहे. काहीही केले तरी यावर नियंत्रण मिळवणे शक्य होताना दिसत नाही, अशात आता एक घटना समोर आली आहे.
लॉकडाऊनमुळे भाईंदर येथे राहणारे हरिश्चंद्र शंकरलाल जांगीर (वय-45) यांच्यावर आर्थिंक संकट ओढावले. इतरांप्रमाणे त्यांनीदेखील त्यांच्या गावी परतायचा निर्णय घेतला. हरिश्चंद्र जांगीर आपल्या गावी राजस्थानात जाण्यासाठी 14 मे रोजी मीरा-भाईंदरहून चालत वसईला पोहचले. वसईवरुन राजस्थानसाठी रेल्वे जाणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. खिशात पैसे नसल्याने हरिश्चंद्र जांगीर यांनी उपाशीपोटी भाईंदर ते वसई असा पायीच प्रवास केला.
वसईत पोहोचल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. एकही नातेवाईक जवळ नसल्याने हरिश्चंद्र जांगीर यांचा मृतदेह विरारमधील शीत शवागृहात ठेवण्यात आला होता. पण या शीतगृहाचे तापमान आवश्यकतेनुसार नसल्याने हरिश्चंद्र यांचा मृतदेह या शवागृताच कुजूला. शेवटी हरिश्चंद्र यांचे भाऊ जयप्रकाश जांगीर हे 17 मे रोजी विरारला पोहोचले. विरार पश्चिम येथे असलेल्या शीतशवागृहात जाऊन पाहिले तर शीतगृहातील वातानुकूलित यंत्रणा नियमित काम करत नसल्याचं त्यांच्या लक्षात आले. तापमान 5 ते 6 अंश सेल्सियस असणे आवश्यक असताना त्याचे तापमान 18 अंश सेल्सियस होते. यामुळे मृतदेह कुजला होता.
दुसरीकडे महापालिकेने कोविड 19 च्या तपासणीसाठी नमुने 2 दिवसांनी घेतल्याने मृतदेह ताब्यात घेण्यास उशीर झाला. शेवटी अंत्यसंस्कार हे विरारमध्येच व्हावे अशी सक्ती करण्यात आली. मात्र, जयप्रकाश जांगीर यांनी परवानगी घेतली अन् दु:खी अंतकरणाने राजस्थानमध्ये राहत्याघरी मृतदेह घेऊन रवाना झाले.