दत्तक मुलीचा गर्भपात करण्याची मागणी धक्कादायक; उच्च न्यायालयाने पालकांना धरले धारेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 11:55 IST2025-01-07T11:54:50+5:302025-01-07T11:55:24+5:30

मुलीचे मानसिक आरोग्य ठीक नसल्याचा दावा; पुढील सुनावणी ८ जानेवारीला

Shocking demand to abort adopted daughter; High Court takes parents to task | दत्तक मुलीचा गर्भपात करण्याची मागणी धक्कादायक; उच्च न्यायालयाने पालकांना धरले धारेवर

दत्तक मुलीचा गर्भपात करण्याची मागणी धक्कादायक; उच्च न्यायालयाने पालकांना धरले धारेवर

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुलीचे मानसिक आरोग्य ठीक नसल्याचा दावा करत दत्तक मुलीचा गर्भपात करण्याची मागणी करणाऱ्या पालकांना उच्च न्यायालयाने चांगलेच धारेवर धरले. एका बाजूला मुलीचे मानसिक आरोग्य ठीक नसल्याचा दावा करता, तर दुसऱ्या बाजूला मुलीला रात्री घराबाहेर पडून थेट दुसऱ्या दिवशी घरी येण्यास परवानगी देता, हे न समजण्यासारखे आहे. तुम्ही कसले पालक आहात? अशा शब्दांत न्यायालयाने पालकांना सुनावले. याप्रकरणी पुढील सुनावणी ८ जानेवारी रोजी ठेवली आहे.

संबंधित दाम्पत्याने मुलीला १९९८ मध्ये ती सहा महिन्यांची असताना दत्तक घेतले होते. मुलगी सध्या २० आठवड्यांची गर्भवती आहे. मुलीला १३व्या वर्षापासून घरापासून दूर केले. मुलीचे मानसिक आरोग्य ठीक नाही म्हणता तर रात्री १० ते दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंत तिला घराबाहेर राहू देता? तुम्ही कसे पालक आहात? तुम्ही तिला मुलगी म्हणून निवडले आहेत, तिने तुम्हाला निवडले नाही. त्यामुळे तिचे मानसिक आरोग्य बिघडल्याचे म्हणत तिला नाकारू शकत नाही. ती नियंत्रणाबाहेर आहे, आम्ही वृद्ध झालो आता तिचा सांभाळ करू शकत नाही, असे पालक म्हणू शकत नाही, असे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठाने म्हटले.

खंडपीठाने पालकांच्या वर्तनावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. मुलगी किशोरवयीन असल्यापासूनच मुलगी अतिहट्टी असल्याचा दावा पालकांनी केला. नको असलेल्या गर्भधारणेसंबंधी पोलिसांत तक्रार का केली नाही? असा प्रश्न न्यायालयाने पालकांना केल्यावर त्यांनी मुलीने सहकार्य न केल्याने गुन्हा दाखल केला नसल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालयाने संताप व्यक्त केला.

मुलीचे मानसिक आरोग्य ठीक नसल्याचा दावा तुम्हीच करता आणि गुन्हा दाखल करण्यासाठी तिची परवानगी मागता? असे म्हणत न्यायालयाने मुलुंड पोलिसांना पालकांनी गुन्हा दाखल केल्यावर तपास करण्याचे निर्देश दिले.

मेडिकल बोर्डाला मुलीची चाचणी करण्याचे निर्देश

  • ‘मुलगी बेरोजगार आहे म्हणून तुम्ही गर्भपात करण्याची परवानी मागत आहात; पण गर्भपातासाठी बेरोजगारी हे कारण असू शकत नाही. आम्ही वृद्ध आहोत मुलीचा सांभाळ करू शकत नाही, असे आम्हाला वारंवार सांगू नका.
  • प्रत्येकानेच वृद्धापकाळाचा विचार केला तर मूल जन्माला देणार नाहीत. तुम्हाला मुलीचा सांभाळ करावाच लागेल,’ असे म्हणत न्यायालयाने जे. जे.च्या मेडिकल बोर्डाला मुलीची चाचणी करण्याचे निर्देश दिले.

Web Title: Shocking demand to abort adopted daughter; High Court takes parents to task

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.