Join us

धक्कादायक! किमान वेतनसह थकीत पगार मागितला म्हणून कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2022 11:16 PM

पालिकेने मलनिःस्सारण प्रकल्प चालवण्यासाठी एसपीएमएल ह्या ठेकेदारास कंत्राट दिले असताना त्याने परस्पर बेकायदा उपकंत्राटदार नेमला आहे.

मीरारोड - तीन महिन्यांचा थकीत पगार सह किमान वेतन आदींची मागणी ठेका कामगारांनी करून कामगार विभाग कडे तक्रार केल्याने पालिकेच्या ठेकेदाराने १४ कामगारांना तडकाफडकी कामावरून काढून टाकल्याचा आरोप भाजपा प्रणित अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाने केला आहे. 

कर्मचारी संघाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय मांडवकर यांनी सांगितले कि , पालिकेने मलनिःस्सारण प्रकल्प चालवण्यासाठी एसपीएमएल ह्या ठेकेदारास कंत्राट दिले असताना त्याने परस्पर बेकायदा उपकंत्राटदार नेमला आहे. ह्या ठिकाणी गेल्या ८ - ९ वर्षां पासून ठेक्याने कर्मचारी कार्यरत आहेत . १४ कंत्राटी कामगारांना तीन महिन्याचा पगार ठेकेदाराने दिला नाही म्हणून त्याची मागणी कामगारांनी चालवली होती. त्या अनुषंगाने संघाने पालिकेसह कामगार विभागा पासून शासना कडे तक्रारी केल्या होत्या. सदर कामगारांना किमान वेतन दिले जात नाही. तसेच त्यांना भविष्य निर्वाह निधी, उपदान आदी कोणत्तेच भत्ते-सुविधा ठेकेदार देत नसताना महापालिका अधिकारी मात्र जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करून कामगारांची पिळवणूक करण्यास ठेकेदाराला मोकळे रान दिले . 

ठाण्याचे सहायक कामगार आयुक्त अ.उ. कुटे यांनी पालिका आयुक्त दिलीप ढोले यांना पत्र पाठवून कंत्राटी कामगार अधिनियम नुसार वेतन अदा करण्याची जबाबदारी मुख्य मालक नात्याने पालिकेची असल्याने कार्यवाही करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे . कामगारांनी न्याय मागितला म्हणून त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता ठेकेदाराने तडकाफडकी कामावरून काढून टाकल्याचा आरोप मांडवकर यांनी केला आहे. या बाबत पालिका अधिकाऱ्यांना भेटून त्या कामगारांना सेवेत पुन्हा सामावून घ्या वा अन्यत्र सेवेत घेण्याची मागणी केली आहे. तसेच ठेकेदार वर करीची मागणी केल्याचे मांडवकर म्हणाले. दरम्यान पालिका अधिकाऱ्यांनी मात्र, कामगारांना थकीत वेतन दिलेले असून कामावर ठेवणे-न ठेवणे हि ठेकेदार व कामगार यांच्यातील बाब असल्याचे सांगण्यात आले.  

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्र