Join us

धक्कादायक! अंत्यसंस्कारांच्या बदल्यात भाचीने मागितला मालमत्तेचा ताबा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 6:35 AM

अमेरिकेतल्या मुलाने पित्यावरील अंत्यसंस्काराची जबाबदारी झटकल्यानंतर, फोर्टमधील फ्रान्सिस झेवियर्स कुटिन्हो (६०) यांच्यावर भाचीने अंत्यसंस्कार केले.

मनीषा म्हात्रेमुंबई : अमेरिकेतल्या मुलाने पित्यावरील अंत्यसंस्काराची जबाबदारी झटकल्यानंतर, फोर्टमधील फ्रान्सिस झेवियर्स कुटिन्हो (६०) यांच्यावर भाचीने अंत्यसंस्कार केले. याच भाचीने कुटिन्हो यांच्या कोट्यवधीच्या मालमत्तेवर दावा ठोकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मात्र, वारसदार असताना मालमत्ता ताब्यात देण्यास पोलिसांनी नकार दिला. तसा अहवालही नुकताच न्यायालयात सादर केला आहे.

फोर्ट येथील मोगल इमारतीत राहणारे फ्रान्सिस हे हाँगकाँग बँकेतून अधिकारी पदावर निवृत्त झाले. त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. मुलीचे लग्न झाले आणि ती अमेरिकेत स्थायिक झाली. मुलगा केल्विन शिक्षणासाठी अमेरिकेत गेला आणि तिथेच स्थायिक झाला. त्याने आईलाही तेथे बोलावून घेतले. त्यामुळे गेल्या आठ वर्षांपासून फ्रान्सिस एकटेच या ठिकाणी राहात होते. गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी त्यांच्या बंद घरात त्यांचा मृतदेह एमआरए मार्ग पोलिसांना आढळला.पोलिसांना शेजाऱ्यांकडून मिळालेल्या मोबाइल क्रमांकावरून गोवा येथील भाची सांचा डिकास्टाशी संपर्क साधून फ्रान्सिस यांच्या मृत्यूची बातमी दिली. सांचाने पत्नी रिना आणि केल्विन यांना मोबाइलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क न झाल्याने तिने केल्विनला ईमेल पाठविला. उत्तरादाखल केल्विनने, पाठविलेल्या इमेलमध्ये, ‘सॉरी, आय एम बिझी नाऊ... मृत्यूची बातमी दिल्याबाबत धन्यवाद! आम्हाला त्यांच्या संपत्तीत रस नाही. त्यामुळे तुम्हीच परस्पर मृतदेहावर अंत्यसंस्कार करा. जमल्यास आमच्याकडूनही त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी प्रार्थना करा...’ असे त्यात म्हटले आणि अंत्यसंस्कारासह सर्व जबाबदाºया झटकल्या. त्यामुळे पोलिसांसमोरही काय करावे, असा प्रश्न निर्माण झाला.

तेव्हा त्यांच्या संपत्तीत काहीच नको म्हणत, सांचाने अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारली. या घटनेला काही महिने उलटल्यानंतर सांचाने त्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचा ताबा द्यावा, याबाबत न्यायालयात दावा केला. याबाबत एमआरए मार्ग पोलिसांनी वारसदार जिवंत असताना भाचीकडे ताबा देणे चुकीचे आहे, असे सांगून याबाबतचा नकारात्मक अहवाल पाठविला आहे. सध्या त्यांचा थ्री बीएचके फ्लॅटही बंद आहे. खरे वारसदार कोण, हे कळत नाही, तोपर्यंत कुणालाही त्याचा ताबा देणार नसल्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे.

टॅग्स :मुंबईमृत्यूरिलेशनशिप