मुंबई आणि महाराष्ट्रातील शरीरसौष्ठव क्षेत्रातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध बॉडीबिल्डर आशिष साखरकर याचं अकाली निधन झालं आहे. गेल्या काही काळापासून तो आजारी होता. आशिषने राज्य, देश आणि जागतिक पातळीवर अनेक स्पर्धा जिंकत शरीरसौष्ठवाच्या क्षेत्रात महाराष्ट्राचं नाव उंचावलं होतं.
तंदुरुस्ती आणि पिळदार शरीराच्या जोरावरं आशिष साखरकर याने शरीरसौष्ठवाच्या क्षेत्रात यशाची एक एक पायरी चढली होती. त्याने महाराष्ट्र श्री, मिस्टर इंडिया, मिस्टर युनिव्हर्स अशा अनेक विजेतेपदांना गवसणी घातली होती. आशिष याने चार वेळा मिस्टर इंडिया, चार वेळा फेडरेशन कपचं विजेतेपद, तर मिस्टर युनिव्हर्समध्ये रौप्यपदक, युरोपियन चॅम्पियनशिप अशा अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवलं होतं. त्याला शिवछत्रपती पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
आशिष साखरकर गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र या आजारपणातच त्याला मृत्यूने गाठले. आज त्याच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.