Join us

मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 7:03 PM

होर्डिंग मालकावर कारवाई करण्याबाबत दोन दिवसांपूर्वीच महापालिका प्रशासनाने नोटीस पाठवल्याची माहिती समोर आली आहे.

Ghatkopar Hording Collapse ( Marathi News ) : वादळी वारा आणि अवकाळी पावसाने झोडपल्याने मुंबईतील अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या आहेत. शहरातील घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर लोखंडी होर्डिंग कोसळलं असून या होर्डिंगखाली ८०च्या आसपास वाहने अडकल्याची माहिती आहे. तसंच या दुर्घटनेत ३५ पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याचे समजते. मुंबईकरांच्या जीवावर बेतू शकणाऱ्या या होर्डिंगबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली असून होर्डिंग मालकावर कारवाई करण्याबाबत दोन दिवसांपूर्वीच महापालिका प्रशासनाने नोटीस पाठवल्याचं भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे.

घाटकोपरमध्ये कोसळलेल्या होर्डिंगबाबत माहिती देताना किरीट सोमय्या म्हणाले की, "महिनाभरापूर्वी हे होर्डिंग बेकायदेशीर असल्याची हरकत घेऊन आम्ही तक्रार केली होती. या होर्डिंगच्या आसपास असणारी झाडे होर्डिंग मालकाने केमिकल टाकून मारली होती. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही केली होती. त्यानंतर या मालिकाविरोधात कारवाई करण्याची नोटीस दोन दिवसांपूर्वी महापालिकेकडून बजावण्यात आली होती. सदर व्यक्तीला अटक करावी, अशी आमची मागणी आहे," असं सोमय्या म्हणाले.

"होर्डिंग पूर्णपणे बेकायदेशीर" 

कोसळलेलं होर्डिंग पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा दावाही किरीट सोमय्या यांनी केला आहे. "एवढ्या मोठ्या आकाराचं होर्डिंग बेकायदेशीरपणे लावण्यात आलं होतं, त्याची उभारणी व्यवस्थित करण्यात आली नव्हती. त्यामुळे या होर्डिंगच्या मालकाविरोधात कायदेशीर कारवाई करावी लागणार आहे," असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.

बचावकार्य सुरू

इंधन भरण्यासाठी आलेल्या गाड्या आणि पाऊस व वादळी वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी आडोशाला उभे असणारे नागरिक या होर्डिंगखाली अडकले आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या आणि प्रशासनातील विविध खात्यांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. वाहनांमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांकडून अथक परिश्रम घेतले जात आहेत.  

टॅग्स :घाटकोपरमुंबईमुंबई मान्सून अपडेट