Join us

धक्कादायक ! मुंबईत दहा हजारांहून अधिक शाळाबाह्य मुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 4:07 AM

अनियमित आणि कोविड काळातील स्थलांतरणामुळे चुकली शिक्षणाची वाटलोकमत न्यूज नेटवर्कमुंबईकोरोना काळात अनेक कुटुंबे एका ठिकाणाहून दुसऱ्या ...

अनियमित आणि कोविड काळातील स्थलांतरणामुळे चुकली शिक्षणाची वाट

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई

कोरोना काळात अनेक कुटुंबे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, काही आपल्या मूळ गावी स्थलांतरित झाली. मात्र याचा थेट परिणाम झाला तो त्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणावर आणि ती शाळाबाह्य होण्यावर. स्थलांतर आणि अनियमित उपस्थितीमुळे मुंबईतील तब्बल दहा हजारांहून अधिक मुले ही शाळाबाह्य ठरली आहेत. शिक्षण विभागाकडून राबविण्यात आलेल्या शाळाबाह्य मोहिमेत मुंबई उपसंचालक कार्यालयाच्या अखत्यारीतील आणि पालिका शिक्षण विभागाच्या अंतर्गत एकूण १० हजार ८२१ मुले ही सद्य:स्थितीत शाळाबाह्य असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील तब्बल ९ हजार ९९५ मुले ही अनियमित उपस्थिती तसेच स्थलांतरणामुळे शाळाबाह्य ठरली आहेत.

मुंबई विभागातील पालिका शिक्षण विभागाच्या माहितीनुसार अनियमित उपस्थिती आणि कधीच शाळेत न गेलेली अशी १० हजार १७७ मुले पालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या १२ युआरसीमध्ये आहेत. यात कधीच शाळेत न गेलेली १८२ मुले आहेत तर ९ हजार ९९५ मुले ही अनियमित उपस्थितीमुळे शाळाबाह्य ठरली आहेत. अनियमित उपस्थितीत तालुक्याबाहेर स्थलांतरित झालेली ११, जिल्ह्याबाहेर म्हणजेच जळगाव, रायगड, परभणी, पुणे नाशिक, औरंगाबाद, ठाणे, सातारा, जळगाव या जिल्ह्यात स्थलांतरित झालेली १ हजार ९९९ मुले आहेत. उत्तर प्रदेश राजस्थान, बिहार, झारखंड, उत्तराखंड, मिझोराम, आसाम, पश्चिम बंगाल, केरळ या राज्यांत स्थलांतर केलेली ७ हजार ९८५ मुले आहेत. विशेष म्हणजे ही मुले या आधी नियमित नसली तरी पालिकेच्या शाळांत त्यांची नोंद होती. मात्र आता ती स्थलांतरित झाली आहेत. याचसोबत या काळात अनेक मुले बाहेरूनही स्थलांतरित होऊन राज्यात, शहरात दाखल झाली आहेत. या मुलांमध्ये बाहेरच्या तालुक्यातून स्थलांतर होऊन ७ मुले आली आहेत तर बाहेरच्या जिल्ह्यांतून २९ मुले दाखल झाली आहेत. बाहेरील राज्यांतून १३ मुले स्थलांतरित होऊन आली आहेत. आता या मुलांना शाळांमध्ये दाखल करून शिक्षण प्रवाहात आणण्याची तयारी सुरू असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

याचप्रमाणे मुंबई उपसंचालक कार्यालयांतर्गत असणाऱ्या शाळांमध्ये ६४४ शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात आला आहे. यामध्ये सर्व अनुदानित शाळांच्या ४ ते ५ शिक्षकांचा समावेश होता. यामध्ये कधीच शाळेत न गेलेल्या शाळाबाह्य मुलांची संख्या २३५ तर अनियमित उपस्थिती आणि स्थलांतरणामुळे ४०८ मुले शाळाबाह्य ठरली आहेत. यामधील १२ मुले ही बालकामगार म्हणून शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर पडली तर इतर ६२४ अन्य कारणामुळे शाळाबाह्य ठरल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

चौकट

महापालिका शिक्षण उपसंचालक

मुले मुली मुले मुली

कधीच शाळेत न आलेली मुले ८७ ९५ १३४ १०१

अनियमित उपस्थितीमुळे

शाळाबाह्य झालेली मुले ५१८८ ४८०७ २३७ १७१