धक्कादायक! मेलेल्या कोंबड्यांची चक्क मुंबईमध्ये विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 04:10 PM2023-08-29T16:10:47+5:302023-08-29T16:11:04+5:30

काशिमीरा उड्डाणपुलाखाली उभ्या राहणाऱ्या कोंबड्या पुरविणाऱ्या गाड्यांमधील मेलेल्या कोंबड्या गोळा करुन प्रत्येकी ३० रुपयांप्रमाणे त्या मुंबईच्या वांद्रे-खार भागात विकणाऱ्यास मनसे कार्यकर्त्यांनी पकडले

Shocking Sale of dead chickens in Mumbai | धक्कादायक! मेलेल्या कोंबड्यांची चक्क मुंबईमध्ये विक्री

धक्कादायक! मेलेल्या कोंबड्यांची चक्क मुंबईमध्ये विक्री

googlenewsNext

मुंबई-

काशिमीरा उड्डाणपुलाखाली उभ्या राहणाऱ्या कोंबड्या पुरविणाऱ्या गाड्यांमधील मेलेल्या कोंबड्या गोळा करुन प्रत्येकी ३० रुपयांप्रमाणे त्या मुंबईच्या वांद्रे-खार भागात विकणाऱ्यास मनसे कार्यकर्त्यांनी पकडले, मेलेल्या कोंबड्या विकून लोकांच्या जीवाशी खेळ केला जात असताना पोलिसांनी मात्र अन्न व औषध प्रशासनास सांगा, असे म्हणत कारवाईस नकार दिल्याचा आरोप मनसैनिकांनी केला आहे. 

काशिमीरा उड्डाणपुलाखाली नमस्कार पेट्रोलपंपासमोर कोंबड्यांचा पुरवठा करुन आलेल्या गाड्या उभ्या राहतात. या गाड्यांमध्ये असलेल्या मेलेल्या कोंबड्या गोळा करुन त्याची विक्री केली जात असल्याचे मनसेचे विभागीय सचिव सचिन जांभळे यांना समजल्याने त्यांनी रविवारी उपविभाग अध्यक्ष करण हरिजन, विलास राक्षेंसह पाळत ठेवली होती. त्यावेळी दोघे जण गाड्यांमधील मेलेल्या कोंबड्या काढून त्या गोणीत भरत असल्याचे दिसले. त्यांच्याकडे जाऊन विचारणा केली असता त्यांनी आधी मेलेल्या कोंबड्या जवळच्या गटारात फेकून देत असल्याचे सांगितले. 

हा तर नागरिकांच्या जीवाशी खेळ
मात्र त्यातील एकाकडे अधिक विचारणा केल्यावर त्याने आपण खारवरुन आलो असून या मेलेल्या कोंबड्या वांद्रे-खार परिसरात ३० रुपयांना एक कोंबडीप्रमाणे विकत असल्याचे सांगितले. दरम्यान, या कोंबड्या खाऊन नागरिकांच्या जीवाचे बरेवाईट झाले असते तर जबाबदार कोण असा प्रश्न या निमित्ताने सामान्य मुंबईकरांनी उपस्थित केला आहे. 

अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करा
मनसैनिकांनी या प्रकरणी उड्डाणपुलाजवळ असलेल्या काशिमीरा पोलीस ठाण्यात नेले असता पोलिसांनी हा आमच्या अखत्यारितला विषय नसून अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करा, असे सांगितल्याने याबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तांकडे ई-मेलद्वारे तक्रार केल्याचे जांभळे यांनी सांगितले.

Web Title: Shocking Sale of dead chickens in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई