मुंबई - राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन राजधानी मुंबईत सुरू आहे. या अधिवेशनात विविध आमदारांच्या तारांकीत प्रश्नांना उत्तरे देताना मंत्रीमहोदयांकडून माहिती देण्यात येत आहे. विरोधी पक्षानेही राज्य सरकारला राज्यातील अनेक प्रश्नांवरुन घेरले आहे. नोकर भरती परीक्षेचा घोटाळा, शेतकऱ्यांचा पीकविमा, सानुग्रह अनुदान, महिलांवरील अत्याचार यांसह विविध मुद्द्यांवरुन विधानसभेत गदारोळ पाहायला मिळत आहे. त्यातच, राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शेतकरी आत्महत्यासंदर्भात दिलेली माहिती धक्कादायक आहे.
राज्यात सरकार कोणाचंही असून बळीराजाने आपले जीवन संपवल्याच्या दुर्दैवी घटना वारंवार घडतच आहेत. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, कधी गारपीट, कधी सावकाराचं कर्ज यांसारख्या अनेक समस्यांना घेऊन बळीराजा अखेर फाशीचा दोर जवळ केल्याचं धक्कादायक आणि लाजीरवाणं चित्र महराष्ट्रात दिसत आहे. महाराष्ट्रात जून 2021 ते ऑक्टोबर 2021 या 5 महिन्यांच्या कालावधीत तब्बल 1076 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं मूळ कारण कर्जाचं ओझं आणि ते चुकीविण्यास ते समर्थ नसणे हेच आहे. नैसर्गिंक संकटे आणि नापिकीकरण यामुळे शेतकरी अडचण येत असून कर्ज फेडू शकत नाही. त्यासोबतच, कौटुंबिक आणि खासगी आर्थित अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळेच, आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल येथील शेतकऱ्यांना उचलावं लागल्याचंही वडेट्टीवार यांनी विधानसभेत माहिती देताना सांगितलं.