लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिंदेसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर निवडून आले असले तरी मतमोजणीबाबत उद्धवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात मंगेश पंडीलकर वनराई पोलिसांनी वायकर यांचा नातेवाईक मंगेश पंडीलकर आणि निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता तपासात पंडीलकर ईव्हीएमशी जोडलेला मोबाइल फोन वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. पोलिसांनी त्यानुसार इतर उमेदवारांचे जबाब नोंदवले असून, लवकरच याप्रकरणी अटक वॉरंट जारी करण्यात येणार आहे.
वनराई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पंडीलकरकडे सापडलेला फोन हा दिनेश गुरव यानेच त्याला दिला होता. हा मोबाइल फोन ४ जून रोजी नेस्को सेंटरमध्ये वापरण्यात आलेले ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यासाठी आवश्यक असलेला ओटीपी तयार करण्यासाठी वापरला गेला.
...अन्यथा अटक वॉरंट जारी करू
- वनराई पोलिसांनी आरोपी पंडीलकर आणि गुरव यांना सीआरपीसी ४१ (ए) अंतर्गत नोटीसदेखील पाठवली आहे.
- वनराई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामप्यारे राजभर यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, पंडीलकरचा मोबाइल आम्ही ४ जून रोजी सीज केला. तसेच त्यातील डेटा शोधण्यासाठी तो मोबाइल फोन फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे (एफएसएल) पाठवला असून, त्या मोबाइल फोनवरील बोटांचे ठसेही घेतले आहेत.
- याच्या अहवालानंतर पंडीलकर हा नेमका कोणाच्या संपर्कात होता हे स्पष्ट होईल, असेही अधिकाऱ्यांनी नमूद केले. आम्ही निवडणूक आयोगाकडून काही एंट्री पॉईंट, स्ट्राँग रूम अशा महत्त्वाच्या ठिकाणच्या कोनाकोपऱ्याचे सीसीटीव्ही फुटेज मागितले आहे.
- जे लवकरच आम्हाला मिळणे अपेक्षित असून, त्यानुसार पुढील तपासाला गती मिळेल. पोलिसांनी इतर उमेदवारांचे बयाणही नोंदवले असून, पंडीलकर आणि गुरव यांना चौकशीसाठी बोलावण्यात येईल, अन्यथा आम्ही अटक वॉरंट जारी करू, असेही तपास अधिकाऱ्यांनी नमूद केले.