धक्कादायक! कोरोना काळात झाले १२ ते १३ बालविवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:06 AM2021-07-22T04:06:19+5:302021-07-22T04:06:19+5:30
मुंबई : गेल्या दीड वर्षापासून आपण कोरोनाशी दोन हात करतानाच अन्य समस्यादेखील उग्र स्वरूप धारण करीत आहेत. ग्रामीण भागासह ...
मुंबई : गेल्या दीड वर्षापासून आपण कोरोनाशी दोन हात करतानाच अन्य समस्यादेखील उग्र स्वरूप धारण करीत आहेत. ग्रामीण भागासह शहरी भागांना अशा समस्यांना सामोरे जावे लागत असून, कोरोनात बालविवाहांचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबईत गोरेगाव, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरासह उर्वरित ठिकाणी बालविवाह झाल्याचे निदर्शनास आले असून, हा आकडा १२ ते १३ च्या आसपास असावा, अशीही शक्यता आहे.
बालविवाह हा विषय मागच्या शतकातील आह. की काय? असे आपण समजतो आहोत. कोरोना काळात मात्र याची दाहकता आपणाला अजून जवळून पाहण्यास मिळाली आहे. बालविवाह म्हणजे एका अर्थाने लैंगिक शोषण आहे, असे सामाजिक कार्यकर्त्या वर्षा विद्या विलास यांनी सांगितले. बालविवाह प्रतिबंध कायदा आहे. मात्र कायद्याची अंमलबजावणीही व्हावी लागते. कोरोना काळात बालविवाह वाढल्याचे निदर्शनास आले आहे. प्रशासनासमोर या गोष्टी अल्प प्रमाणात येतात. सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून हे प्रकार उघडकीस येतात, असेही वर्षा यांनी नमूद केले.
६६ टक्क्यांपेक्षा जास्त बालविवाह
महाराष्ट्रात कोरोना काळात आठ हजारपेक्षा जास्त म्हणजे ६६ टक्क्यांपेक्षा जास्त बालविवाह झाले आहेत. याची कारणे पाहिली तर खूप आहेत. कोणत्याही एका समाजात हे प्रमाण अधिक आहे किंवा कमी आहे, असे नाही. सर्व समाजांत बालविवाहाचे प्रमाण आहे.
...म्हणून बालविवाह झाले
मुलींनी स्वत:हून लग्न केलेले नाही. जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले आहे. शाळा बंद आहेत. मुलगी वयात आलेली आहे. आर्थिक गरिबी आहे. दिवसभर मजुरी करून पोट भरणाऱ्या लोकांमध्ये बालविवाहाचे प्रमाण अधिक आहे. शिवाय मुलगी एखाद्या संकटात सापडली तर भविष्यात अडचणी येतील; अशा गोष्टी ध्यानात ठेवून बालविवाह झाले आहेत.
समाज काय म्हणेल?
दुसरे म्हणजे कोरोनाकाळात आपण जिवंत असेपर्यंत आपल्या मुलीचे लग्न झाल्याचे पाहावयास मिळावे म्हणूनदेखील लग्ने झाली आहेत. मुलगी म्हणजे काचेचं भांडं असाच विचार केला जातो. हा विषय खूप मोठा आहे. कधी एकदाची मुलीची अठरा वर्षे पूर्ण होतात आणि तिचे लग्न लावतो, असा विचार केला जातो. मानसिकता ही आहे. समाज काय म्हणेल? यातून आपण बाहेर पडले पाहिजे.
आर्थिक प्रश्न आहे
एकल महिलांचा विषय आहे. या महिला मुलींना सांभाळत आहेत त्यांच्यासमोर अनेक प्रश्न आहेत. अशा मुलींची लग्ने झाली आहेत. आर्थिक प्रश्न मोठा आहे. ग्रामीण आणि शहरी पातळीवर काम झाले पाहिजे. सगळ्या समित्यांनी यावर एकत्र काम केले पाहिजे. महिला प्रश्नांवर जिल्हा, तालुका, गावात संस्था काम करीत आहेत. त्यांना अशा कामात सामावून घेतले पाहिजे.
बालविवाह थांबतील
लोकसहभाग महत्त्वाचा आहे. जनजागृती झाली पाहिजे. मग, अशा गोष्टींना आळा बसेल. बालविवाह प्रतिबंध अभियान उभे केले पाहिजे. शासकीय आणि निमशासकीय स्तरावर जागृती केली पाहिजे. शाळा पातळीवर काम केले पाहिजे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, याचाही विश्वास निर्माण केला पाहिजे. राजकीय लोकांनी यात हस्तक्षेप केला पाहिजे. चाईल्ड लाईन क्रियाशील केले पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मराठी भाषेतील एक संकेतस्थळ यासाठी हवे. जेणेकरून बालविवाह थांबतील. बालविवाह आटोक्यात येतील.