धारावी स्फोटातील धक्कादायक सत्य! सर्व परवान्यांची मुदत संपली; तरीही दुर्घटनाग्रस्त ट्रक रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 05:57 IST2025-03-26T05:56:18+5:302025-03-26T05:57:01+5:30
धारावीत सिलिंडरने भरलेल्या ट्रकच्या स्फोटात जळालेल्या त्या ट्रकचे सर्व कागदपत्रे कालबाह्य झाली असूनही तो अनधिकृतपणे रस्त्यावर धावत होता

धारावी स्फोटातील धक्कादायक सत्य! सर्व परवान्यांची मुदत संपली; तरीही दुर्घटनाग्रस्त ट्रक रस्त्यावर
महेश काेले, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: धारावी परिसरात सोमवारी रात्री सिलिंडरने भरलेल्या ट्रकच्या स्फोटात जळालेल्या त्या ट्रकचे सर्व कागदपत्रे कालबाह्य झाली असूनही तो अनधिकृतपणे रस्त्यावर धावत होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या ट्रकची नोंदणी २०११ साली वसई आरटीओ कार्यालयात निनाद गॅस सर्व्हिसेस कंपनीच्या नावावर झाली होती. १३ वर्षांहून अधिक जुना असलेला हा ट्रक वाहतुकीसाठी आवश्यक असलेले सर्व परवाने संपलेल्या अवस्थेत रस्त्यावर होता.
आरटीओने दिलेल्या माहितीनुसार, या ट्रकची शेवटची फिटनेस चाचणी २०२२ मध्ये वाशी आरटीओ कार्यालयात झाली होती. त्यावेळी ट्रकला दोन वर्षांसाठी फिटनेस प्रमाणपत्र देण्यात आले होते. मात्र, फिटनेस प्रमाणपत्राची मुदत संपण्यापूर्वी महिनाभर अगोदर पुन्हा चाचणी करणे बंधनकारक असते. या ट्रकच्या बाबतीत ही प्रक्रिया पार पाडली गेलेली नाही. याशिवाय, ट्रकचे इन्शुरन्स, परमिट, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) आणि टॅक्स व्हॅलिडिटी हे सर्व कालबाह्य झाले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.