मुंबई - विद्याविहार येथील सोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच खेळ खेळताना 20 वर्षीय जीबीन सनी या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत विद्यार्थाला शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. सोमय्या महाविद्यालयामध्ये स्पोर्ट्स डे निमित्त रस्सीखेच स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. खेळासाठी दोन गट करण्यात आले होते. जीबीन सनीदेखील या खेळात सहभागी झाला होता. व्हिडीओत जीबीन सनी सर्वात पुढे उभा असल्याचं दिसत आहे. पूर्ण जोर लावून तो दोरखंड ओढताना दिसत आहे. जोरात दोरखंड ओढण्यासाठी त्याने मानेवर दोरखंड घेतल्याचे दिसत आहे.
रस्सीखेच खेळ खेळत असताना आकस्मितपणे महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना विद्याविहार येथील सोमय्या महाविद्यालय परिसरात घडली आहे. यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवर शोककळा पसरली आहे. ठाणे येथील वागळे इस्टेट परिसरात राहणारा जीबीन सनी हा महाविद्यालयीन खेळात सहभागी झाला होता. रस्सी खेच सुरू असताना जीबीन याने सर्वांच्या पुढे उभे राहत आपली टाकत लावली आणि रस्सी खेचसाठी असलेला दोरखंड ही आपल्या खांद्यावर घेतला. मात्र, काही क्षणात खांद्यावर भर घेतल्याने जीबीन खाली कोसळला. त्यानंतर त्वरित कॉलेजच्या सुरक्षारक्षकांनी त्याला राजावाडी रुग्णालयात आणले. मात्र, त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. सोमय्या विद्याविहारच्या नर्सिंगचा हा विद्यार्थी होता. डिहायड्रेशन किंवा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह नेण्यात आला असून त्यानंतरच नेमकं कारण कळू शकणार आहे. मात्र, या घटनेने महाविद्यालयात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेबाबत टिळक नगर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात येत असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.