मुंबई - मुंबईत भटकंती करताना युवा वर्गाची समुद्र किना-यांना पहिली पसंती असते. कपल्सही मोठया संख्येने समुद्र किनारी बसलेली दिसतात. पण आता हेच समुद्र किनारे कपल्ससाठी धोकादायक ठरु लागले आहेत. मुंबईतील प्रसिद्ध वरळी सी-फेसवर दिवसाढवळया एका डॉक्टर जोडप्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी गुन्ह्याची नोेंद झाली आहे.
7 फेब्रुवारीला एक डॉक्टर कपल वरळी सी-फेसवर बसलेले असताना दोन महिलांनी त्यांचे फोटो काढले. त्यानंतर या महिला या जोडप्याजवळ गेल्या व तुम्ही इथे काय करताय ? म्हणून विचारणा केली. जेव्हा या जोडप्याने तुम्ही कोण आहात म्हणून विचारणा केली. तेव्हा त्यांनी आपण एका एनजीओचे सदस्य असून समाजसेवेचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
इथे बसून गप्पा मारण्यामध्ये काय चुकीचे आहे असे जेव्हा डॉक्टरांनी विचारले तेव्हा त्यांनी काहीही उत्तर दिले नाही. फोटो काढणा-यांनी आपल्याकडे 50 हजार रुपयांची मागणी केली व पैसे दिले नाहीत, तर सी-फेसवर बसून अश्लील चाळे करता ते तुमच्या कुटुंबियांना सांगू अशी उलटी धमकी दिल्याचा दावा डॉक्टर जोडप्याने केला आहे.
या प्रकरणातील पुरुष आणि महिला डॉक्टर तीन वर्षांपासून परस्परांना ओळखतात. ते शहरातील वेगवेगळया रुग्णालयात नोकरीला आहेत. 7 फेब्रुवारीला भेटल्यानंतर त्यांनी वरळी सी-फेसवर वेळ घालवण्याचा निर्णय घेतला. जशी आपली फसवणूक झाली तशी अन्य जोडप्यांची होऊ नये म्हणून आपण पोलिसात तक्रार दाखल केली असे या जोडप्याने सांगितले. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे.