हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध विनोदी अभिनेते बिरबल खोसला (८४) यांचे आज संध्याकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास निधन झाले. बिरबल यांचे मित्र जुगनू यांनी त्यांच्या निधनाची बातमी प्रसारमाध्यमांना दिली.
२८ ऑक्टोबर १९३८ रोजी पंजाबमधील गुरुदासपूर येथे जन्मलेल्या बिरबल यांचे खरे नाव सतिंदर खोसला होते. 'अनिता' चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना मनोज कुमार आणि दिग्दर्शक राज खोसला यांना सतिंदर यांचे नाव नॉन-फिल्मी वाटले आणि त्यांनी ते बदलून बिरबल ठेवले. १९६७मध्ये रिलीज झालेल्या बहुचर्चित 'उपकार' चित्रपटाद्वारे बिरबल यांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. त्यानंतर हिंदीसह पंजाबी, भोजपुरी आणि मराठी अशा जवळपास ५०० चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला.
हिंदी सिनेसृष्टीत माईलस्टोन ठरलेल्या 'शोले' या चित्रपटात बिरबल यांनी अर्धवट छाटलेल्या मिशांमधील कैद्याची भूमिका साकारली आहे. याखेरीज त्यांनी उपकार, रोटी कपड़ा और मकान, क्रांती, दिल, अनजान, सदमा, फिर कभी, अमीर गरीब, रास्ते का पत्थर, सुन मेरी लैला, अनीता, इंसान, एक महल का सपना हो, मोहब्बत की आरजू, बलिदान, छोरी मेरा काम, ईमानदार, दो बदन, पागल कहीं का आदी बरेच सिनेमेही केले आहेत.