Join us

'तानाजी' चित्रपटाच्या शूटिंगसाठी फिल्मसिटीचा नाला बुजवला,  झाडे तोडल्याचेही उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 8:20 PM

चित्रपटाच्या शूटिंगला येत्या 31 मे पर्यंत फिल्मसिटीच्या प्रशासनाने परवानगी दिली आली आहे.

- मनोहर कुंभेजकर

मुंबई : फिल्मसिटीतील बिग बॉसच्या हिंदी मालिकेच्या शूटिंगसाठी वृक्षतोड केल्याची घटना ताजी असतानाच आता प्रसिद्ध चित्रपट अभिनेता व निर्माताअजय देवगणने तानाजी चित्रपटाच्या शूटिंगसाठी चक्क येथील नैसर्गिक नाला बुजवला आहे. तर माहिती अधिकारात झाडे तोडल्याचे देखिल उघड झाले आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला येत्या 31 मे पर्यंत फिल्मसिटीच्या प्रशासनाने परवानगी दिली आली आहे.

फिल्मसिटीच्या विष्णू मैदान या बाह्यचित्रीकरण स्थळावर तसेच लगतच्या नाल्यात रँबीटची भरणी करून "मे अजय देवगण फिल्मस्"या निर्मात्याने गेल्या नोव्हेंबर 2018 मध्ये डोलारा(सेट)उभारण्याचे काम हाती घेतले. याठिकाणी बेकायदेशीरपणे मोठ्या झाडांची कत्तल झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते राजकिरण साळवे यांनी केली होती. परंतु त्यांना फिल्मसिटी व्यवस्थापनाकडून योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांनी माहितीच्या अधिकारात या निर्मात्याने झाडांची कत्तल केल्याबद्धल माहिती मागवली होती.

माहितीच्या अधिकारात मिळाळलेल्या माहिती नुसार, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे सुरक्षा अधिकारी एस.आर.चौबे यांनी गेल्या 28 डिसेंबर 2018 रोजी येथे सेट उभारण्याचे काम सुरू असताना या निर्मात्याने झाडे तोडल्याचे निष्पन्न झाल्याचे त्यांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे.सदर अहवाला हा फिल्मसिटीचे प्रशासन व मुख्यअधिकारी अशोक जाधव यांना सादर केला आहे.

चित्रनगरीचे उपअभियंता (स्थापत्य)चंद्रकांत कोळेकर यांनी दि,21 फेब्रुवारी 2019च्या त्यांच्या टिपणीत विष्णू मैदान या बाह्यचित्रीकरण स्थळावर जाण्यासाठी येथील नाल्यात भरणी करून रस्ता तयार केला आहे.तसेच नाल्याच्या प्रवाहात सेप्टिक टॅंक देखिल बांधण्यात आला असून डोलारा(सेटचे)फायर ऑडिट झाले नसल्याचे कोळेकर यांनी त्यांच्या अहवालात नमूद केले आहे.

अशाप्रकारे फिल्मसिटीत मोठाले सेट उभारण्यासाठी येथील जंगल संपत्ती नष्ट केली जात असल्याचा आरोप साळवे यांनी 'लोकमत'शी बोलताना केला.यावर अजून काही कारवाई झाली नसून सर्व काही कागदावरच असल्याची टिपणी त्यांनी केली. येथील नाला एकवेळ रँबीट काढून पूर्ववत करता येईल,मात्र येथील सेट उभारण्यासाठी झाडे तोडली त्यांचे काय? तोडलेली झाडे परत पूर्ववत उभी करणे हे कदापी शक्य नाही. आता यावर पी दक्षिण विभागाच्या सहाय्यक पालिका आयुक्त व उद्यान विभाग काय कारवाई करणार असा सवाल साळवे यांनी केला. जर येत्या पावसाळ्यात येथील नैसर्गिक नाला बुजवल्याने जर येथील आजू बाजूच्या वस्तीत पाणी शिरल्यास  जबाबदार  कोण? असा प्रश्नही त्यांनी केला.

दरम्यान, फिल्मसिटीचे सह व्यवस्थापकीय संचालक निवृत्ती मराळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आम्हाला येथील नाला बुजवल्याचे समजल्यावर आम्ही निर्मात्याकडून नाल्यातील रँबिट बाहेर काढून घेतले.तसेच या सेटची परवानगी येत्या दि,31 मे पर्यंत असल्याने त्यांचे काम संपल्यावर आम्ही येथील सेटची जागा त्यांच्याकडून पूर्ववत करून घेणार आहे. तसेच पावसाळा दि,31 मे पर्यंत पावसाळा सुरू होत नसल्याने पाणी तुंबणे शक्य नाही असा दावा त्यांनी केला आहे.

टॅग्स :मुंबई