फिल्मसिटीतील शूटिंगच्या सेट्सकडे अग्निशमनचे लायसन्स नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 07:34 PM2019-05-13T19:34:14+5:302019-05-13T19:38:02+5:30
गोरेगाव पूर्व फिल्मसिटीतील बिग बॉस, हिंदी मालिका व तानाजी चित्रपटाच्या शूटिंगचे सेट्स उभारण्यासाठी वृक्षतोड करण्यात आल्याची घटना लोकमतने नुकतीच उघडकीस आणली होती.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई : गोरेगाव पूर्व फिल्मसिटीतील बिग बॉस, हिंदी मालिका व तानाजी चित्रपटाच्या शूटिंगचे सेट्स उभारण्यासाठी वृक्षतोड करण्यात आल्याची घटना लोकमतने नुकतीच उघडकीस आणली होती. फिल्मसिटीत मोठाले शूटिंगचे सेट्स व गोडाऊन उभारण्यासाठी फायरब्रिगेडचे लायसन्स आणि पालिकेच्या पी दक्षिण विभागाची परवानगीच स्टुडिओ मालक घेत नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते राजकीरण साळवे यांनी केली आहे. याकडे फायरब्रिगेडचे तसेच पालिकेच्या पी दक्षिण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
येथे सुमारे 38 स्टुडिओ सेट्स उभारले असून त्यांच्याकडे फायरब्रिगेडचे लायसन्स नाही आणि पालिकेची परवानगी देखिल घेतली जात नाही, असा आरोप त्यांनी केला. सध्या येथे तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेसह अनेक मालिका व चित्रपटांचे शुटिंग जोरात सुरू आहे.
याबाबत साळवे यांनी सांगितले की,सध्या रोज मुंबईत आगी लागण्याच्या घटना घडत असतात. 15 एप्रिल 2015 मध्ये फिल्मसिटीतील कपिल शर्मा यांच्या शूटिंग सेट्सला आग लागली होती. त्यामुळे जर भविष्यात येथील शुटिंग सेट्सला आग लागून येथील पर्यावरणाची व वित्तहानी होऊ नये म्हणून फायर ब्रिगेडची परवानगी घेणे कायद्याने बंधनकारक केले पाहिजे. तसेच येथे शूटिंग सेट्स व गोडाऊन उभे करताना पालिकेने नवीन नियमावली तयार करणे गरजेचे असल्याचे मत साळवे यांनी व्यक्त केले.
याप्रकरणी अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी सांगितले की, फिल्मसिटीत शुटिंग सेट्स उभारण्यासाठी अग्निशमन दलाची परवानगी घेणे कायद्याने बंधनकारक आहे.