Join us

प्रतिबंधात्मक लसी महापालिका स्तरावर खरेदी करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 5:12 AM

स्वाइन फ्लू, लेप्टोस्पायरोसिस आणि डेंग्यूच्या आजारांवरील प्रतिबंधात्मक लसी राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत महापालिकांना पुरविल्या जातात.

मुंबई : स्वाइन फ्लू, लेप्टोस्पायरोसिस आणि डेंग्यूच्या आजारांवरील प्रतिबंधात्मक लसी राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत महापालिकांना पुरविल्या जातात. मात्र, लसींची वाढती मागणी लक्षात घेता, पालिका स्तरावर लसींची खरेदी करावी, असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व महापालिकांना दिले. हे आजार आटोक्यात आणण्यासाठी मुंबई महापालिकेने ज्या बाबी अंमलात आणल्या आहेत, त्या राज्यातील इतर महापालिकांनी स्वीकारून, त्यानुसार कार्यवाही करावी, असे निर्देशही आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.मंत्रालयात सोमवारी साथरोग नियंत्रण समितीची बैठक झाली. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील साथरोग परिस्थितीचा आढावा घेतला. सध्या राज्यात साथरोगाचा उद्रेक नसून, परिस्थिती नियंत्रणात आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर भागात पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने लेप्टो आजाराची शक्यता बळावते. या पार्श्वभूमीवर महापालिकांनी ज्या भागात पाणी साचून राहते, तेथील अतिजोखमीच्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक उपचार सुरू करावेत. कोकण किनारपट्टीवरील ग्रामीण आणि शहरी भागातील संशयित रुग्णांचे प्रयोगशाळा नमुने नियमित पाठविण्यात यावे. उंदीर नियंत्रणासाठी आंतरविभागीय समन्वय ठेवावा, अशा सूचना आरोग्यमंत्र्यांनी यावेळी महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या.यावेळी मलेरिया, चिकुनगुनिया, जपानी मेंदूज्वर, माकडताप, चंडीपुरा या आजारांबाबत आढावा घेण्यात आला. राज्यात स्वाइन फ्लू, लेप्टोस्पायरोसिस आणि डेंग्यू आजार नियंत्रणात आहे. साथरोग आणि कीटकजन्य आजारांचे दैनंदिन सर्वेक्षण केले जाते, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. बैठकीस आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, साथरोग नियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ.सुभाष साळुंके, आरोग्य आयुक्त डॉ.अनुपकुमार यादव, आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील, सहआयुक्त डॉ. सतीश पवार आदी उपस्थित होते.>‘खासगी डॉक्टरांची कार्यशाळा घ्या’नाशिक, नागपूर, अहमदनगर, पुणे या जिल्ह्यांमध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात आढळून आली आहे. या भागातील महापालिकांनी अधिक दक्ष राहून प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जाणीव जागृती मोहीम घेणे गरजेचे आहे. स्वाइन फ्लू उपचारासाठी जो प्रोटोकॉल तयार करण्यात आला आहे, त्यानुसार खासगी रुग्णालयांनीदेखील वापर करत उपचार करावा. त्याचबरोबर, स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांना तातडीने टॅमीफ्लूच्या गोळ्या देऊन उपचार सुरू करावेत. यासाठी खासगी डॉक्टरांची कार्यशाळा घ्यावी, असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी दर आठवड्याला साथरोगाचा आढावा घ्यावा, असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :स्वाईन फ्लू