दुकानातील कर्मचाऱ्यांना मारहाण

By admin | Published: May 8, 2016 03:45 AM2016-05-08T03:45:31+5:302016-05-08T03:45:31+5:30

माहीम येथील मिठाईच्या दुकानातील कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेत दुकानात घुसून ७ कर्मचाऱ्यांना

Shop staff beat | दुकानातील कर्मचाऱ्यांना मारहाण

दुकानातील कर्मचाऱ्यांना मारहाण

Next

मुंबई : माहीम येथील मिठाईच्या दुकानातील कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेत दुकानात घुसून ७ कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी शाहू नगर पोलीस ठाण्यातील तीन हवालदारांविरुद्ध माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहीम परिसरात नंदलाल सिंग यांचे संदेश स्वीट मार्ट हे मिठाईचे दुकान आहे. शुक्रवारी मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास शाहू नगर पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी या दुकानात शिरले. त्या वेळी जवळपास १२ ते १३ कर्मचारी दुकानात झोपले होते, तर काही जण गप्पा मारत होते. पोलिसांनी थेट त्यांना बेदम चोप देण्यास सुरुवात केली. यापैकी एक पोलीस कर्मचारी गणवेशात होता, तर दोघे जण साध्या वेशात असल्याची माहिती कर्मचारी रमेश पटेल याने दिली आहे. इतकेच नव्हे, तर पोलीस दारूच्या नशेत असल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी केला आहे. आपण गुन्हा केला असेल तर पोलीस ठाण्यात घेऊन जावे, मारू नये अशी विनवणी कर्मचाऱ्यांनी अनेकदा करूनही पोलीस मारतच राहिले, असे दुकान चालक चंदन सिंह यांनी सांगितले. त्यानंतर मारहाण करणाऱ्या पोलिसांपैकी एकाने पोलीस नियंत्रण कक्षास कॉल करून पोलिसांना मारहाण झाल्याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच माहीम पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी कर्मचाऱ्यांनाच ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. जखमी कर्मचाऱ्यांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शनिवारी सकाळी दुकानमालकाने वकिलांसह पोलीस ठाणे गाठून याचा जाब विचारला. माहीम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी या कर्मचाऱ्यांनी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीदरम्यान येथील एका पोलीस हवालदारासोबत किरकोळ वादातून बाचाबाची झाली होती. याच रागातून तो पोलीस हवालदार त्याच्या इतर सहकाऱ्यांसोबत येथे धडकल्याची माहिती तपासात समोर येत आहे. या प्रकरणी शाहू नगर पोलीस ठाण्याचे अंमलदार राजदीप मोरे (३२), विशाल भगत (२७), महादेव कांबळे (२७) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चौकशी करून कारवाई करणार असल्याचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Shop staff beat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.