महापालिकेच्या अपुऱ्या कामाचा फटका दुकानदारांना; ३५ हजार किमतीचे दोन मोबाइल चोरीला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 01:24 AM2020-02-04T01:24:52+5:302020-02-04T01:25:29+5:30
कांदिवली पश्चिमेकडील ओल्ड लिंक रोड, गणेशनगर येथील रस्त्यालगत असलेल्या गटाराचे काम महापालिकेकडून सुरू आहे.
मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील ओल्ड लिंक रोड, गणेशनगर येथील रस्त्यालगत असलेल्या गटाराचे काम महापालिकेकडून सुरू आहे. परंतु एक महिना उलटून गेला तरीही गटाराचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे दुकानदारांना दुकानाचे शटर बंद करता येत नाही. परिणामी दुकान मालक व चालकांना दुकानातच रात्र काढावी लागत आहे. याशिवाय एका बाइक शोरूममधून सोमवारच्या पहाटे ३५ हजार रुपयांच्या दोन मोबाइल चोरीची घटना घडली. त्यामुळे महापालिका अपुरे काम कधी पूर्ण करणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
आदल्या दिवशी कामानिमित्त पुण्याला जाऊन आलो. त्यानंतर सोमवारी मध्यरात्री दोन वाजता दुकानातच झोपलो. पहाटे चार वाजताच्या दरम्यान ३५ हजार रुपयांचे दोन मोबाइल चोरट्यांनी लंपास केले. पहाटे साडेचार वाजता जाग आली, तेव्हा चोरीची घटना उघडकीस आली. जोपर्यंत महापालिका गटाराचे अपूरे काम पूर्ण करत नाही, तोपर्यंत दुकानाचे शटर बंद होणार नाही.
माझे बाइकचे शोरूम असून महापालिकेच्या अपुºया कामामुळे व्यवसायात एक महिन्याचा तोटा झाला आहे. तसेच त्यात भरीसभर म्हणून ३५ हजाराचे मोबाइल चोरीला गेले. यासंबंधी स्थानिक नगरसेवक कमलेश यादव यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे, अशी माहिती दुकानचालक माहुल कांबळे यांनी दिली.
काम पूर्ण होण्यास आणखी कालावधी लागणार
येथील दुकानदारांनी पाच फूट जास्त दुकान रस्त्यावर वाढविले आहे. जेव्हा गटाराचे काम सुरू होणार होते. तेव्हा वाढविलेले दुकान मागे घ्या, असे त्यावेळी सांगण्यात आले होते. परंतु त्यांनी दुकान मागे घेतले नाही, त्यामुळे ते त्रस्त आहेत. महापालिका दुकानाचे वाढीव बांधकाम तोडत होती. परंतु दुकानदारांनी स्वत: दुकान मागे घेतो, असे सांगितले होते. आता त्यांच्या सोयीनुसार महापालिका काम करत आहे. गटाराचे खूप मोठे काम आहे, त्यामुळे काम पूर्ण होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे, अशी माहिती नगरसेवक कमलेश यादव यांनी दिली.