‘त्या’ दुकानदारांचा परवाना होणार रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 04:21 AM2017-08-06T04:21:19+5:302017-08-06T04:21:21+5:30
रस्त्यावर बाकडे टाकून साहित्य विकणारे फेरीवालेही मुंबईच्या कचºयात भर घालत असतात. यापैकी अधिकृत फेरिवाल्यांना स्वतंत्र कचराकुंडी ठेवण्याची सक्ती मुंबई महापालिकेने केली आहे.
मुंबई : रस्त्यावर बाकडे टाकून साहित्य विकणारे फेरीवालेही मुंबईच्या कचºयात भर घालत असतात. यापैकी अधिकृत फेरिवाल्यांना स्वतंत्र कचराकुंडी ठेवण्याची सक्ती मुंबई महापालिकेने केली आहे. तरीही अनेक फेरीवाले या नियमाला केराची टोपी दाखवून मुंबईची कचराकुंडी करीत आहेत. त्यामुळे कचराकुंडीची व्यवस्था न करणाºया फेरीवाल्यांचा परवानाच यापुढे रद्द करण्याचा निर्णय आयुक्त अजय मेहता यांनी घेतला आहे.
महापालिका मुख्यालयात घेण्यात आलेल्या मासिक आढावा बैठकीत आयुक्तांनी असे आदेश अधिकाºयांना दिले आहेत. मुंबईवरील कचºयाचा भार कमी करण्यासाठी पालिकेने सुरू केलेल्या मोहिमेला फेरीवाल्यांनी हरताळ फासला आहे. बेकायदा फेरीवाल्यांबरोबरच अधिकृत फेरीवालेही यामुळे पालिकेच्या डोकेदुखीचे कारण ठरले आहेत. यापैकी बेकायदा फेरीवाल्यांवर नियमित कारवाई होत असल्याचा दावा पालिका प्रशासन करीत आहे. मात्र, अधिकृत फेरीवाले अद्यापही या नियमांकडे कानाडोळा करीत आहेत.
मासिक आढावा बैठकीत या प्रश्नाकडे अधिकाºयांनी लक्ष वेधले. दुकानदार, अधिकृत फेरीवाल्यांना शिस्त लावण्यासाठी कठोर पावले उचलण्याची विनंती अधिकाºयांनी केली. त्यानुसार, कचराकुंडीची व्यवस्था न करणाºया अधिकृत फेरीवाल्यावर कठोर कारवाईचे संकेत करून त्यांचा परवाना रद्द करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
गॅसपुरवठादार कंपनीवर कारवाई
रस्त्यावर खाद्यपदार्थ बनवून विकणाºया अनधिकृत विक्रेत्यांविरोधात कारवाई सुरू आहे. मात्र, कारवाईनंतरही काही दिवसांनी फेरीवाले पुन्हा त्या रस्त्यांवर परतत आहेत. त्यामुळे ही कारवाई तीव्र करण्यास आयुक्तांनी शनिवारी अधिकाºयांना बजावले, परंतु या विक्रेत्यांवर वारंवार कारवाई करून व त्यांच्याकडील गॅस सिलिंडर जप्त करूनदेखील, पुढच्या कारवाईदरम्यान पुन्हा गॅस सिलिंडर आढळून येत आहेत. याची गंभीर दखल घेऊन, अनधिकृत विक्रेत्यांकडे आढळून आलेल्या गॅस सिलिंडरच्या पुरवठादारावरच गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.