मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेत असताना लंडनमधील ज्या घरात राहत होते ते खरेदी करण्याची प्रक्रिया येत्या मेअखेर राज्य शासनाकडून पूर्ण केली जाईल, असे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. बडोले, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे आणि या विभागाचे प्रधान सचिव उज्ज्वल उके या घराच्या खरेदीसाठी अलीकडेच लंडनला गेले होते. बडोले यांनी सांगितले की, या घराच्या खरेदीपूर्वी या वास्तूची किंमत ठरविण्यासाठी राज्य सरकारने व भारतीय उच्चायुक्तालयानेही स्वतंत्र व्हॅल्युअरची नियुक्ती केली आहे. दोन्हींचा अहवाल येत्या १५ दिवसांत आल्यानंतर खरेदीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. संपूर्ण इमारतीची किंमत साधारणत: ४० कोटींच्या घरात असेल, असा अंदाज आहे. लंडनमधील १०, किंग्ज हेन्री मार्गावरील घरात डॉ. आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. स्मारकाच्या देखभालीसाठी वर्षाकाठी ६० लाख रुपये लागणार असून त्यासाठीची तरतूदही शासनातर्फे केली जाईल, असे बडोले यांनी सांगितले. या वेळेस दिलीप कांबळे, उज्ज्वल उके उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)लंडनमध्ये डॉ. आंबेडकर अध्यासनलंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्समध्ये बाबासाहेब १९२१ ते १९२३ दरम्यान शिकले. जागतिक कीर्तीच्या या संस्थेत बाबासाहेबांच्या नावाचे अध्यासन सुरू करण्याबाबत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी आमची चर्चा झाली आणि त्यांनी याबाबत अनुकूलता दर्शवित तसा प्रस्तावही दिला आहे, असे बडोले यांनी सांगितले.
बाबासाहेबांच्या घराची खरेदी मे महिन्यात
By admin | Published: April 30, 2015 2:02 AM