पश्चिम रेल्वे मार्गावर ‘शॉपिंग ऑन बोर्ड’ सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 01:59 AM2019-03-03T01:59:46+5:302019-03-03T01:59:56+5:30
विमानाप्रमाणे पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवासात प्रवाशांना अधिक सुविधा देण्याच्या उद्देशाने १६ मेल, एक्स्प्रेसमध्ये ‘शॉपिंग ऑन बोर्ड’ ही नवीन सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई : विमानाप्रमाणे पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवासात प्रवाशांना अधिक सुविधा देण्याच्या उद्देशाने १६ मेल, एक्स्प्रेसमध्ये ‘शॉपिंग ऑन बोर्ड’ ही नवीन सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाडी क्रमांक १२००९ आणि १२०१० मुंबई सेंट्रल-अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेसमध्ये आणि गाडी क्रमांक १९०२७ आणि १९०२८ वांद्रे टर्मिनस - जम्मू विवेक एक्स्प्रेसमध्ये ही सुविधा नुकतीच लागू करण्यात आली. महिलांची सौंदर्य प्रसाधने आणि लहान मुलांचे खेळण्याचे साहित्य ‘शॉपिंग आॅन बोर्ड’मध्ये असणार आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावरील मेल, एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शॉपिंग करण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. एकूण १६ मेल, एक्स्प्रेसमध्ये ‘शॉपिंग आॅन बोर्ड’ ही नवीन सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मेल, एक्स्प्रेसमध्ये तीन बाय तीन फुटांपर्यंतच्या शॉपिंग ट्रॉलीसह दोन कर्मचाऱ्यांद्वारे विक्री सुरू आहे. त्यांच्याकडे डेबिट आणि क्रेडिट कार्ड स्वाइप मशीनयाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना विशेष ड्रेस कोड देण्यात आला असून सकाळी ८ ते रात्री ९ या वेळेत विविध गृहोपयोगी साहित्य विकतात. कोणत्याही प्रवाशांवर वस्तू घेण्याची जबरदस्ती किंवा त्रास होता कामा नये, अशा सूचना कर्मचाºयांना देण्यात आल्या आहेत. एका खासगी कंपनीला पाच वर्षांचे ३.६६ कोटी रुपयांचे कंत्राट देऊन ‘शॉपिंग आॅन बोर्ड’ संकल्पना सुरू करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले.