Join us

खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये लगबग

By admin | Published: October 22, 2016 3:13 AM

अवघ्या काही दिवसांवर आलेली दिवाळी पाहता बाजारात खरेदीची लगबग सुरू झाली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सोन्या-चांदीचे दागिने

मुंबई : अवघ्या काही दिवसांवर आलेली दिवाळी पाहता बाजारात खरेदीची लगबग सुरू झाली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सोन्या-चांदीचे दागिने, वाहनांसह नवीन घर घेण्यासाठी आकर्षक सवलत आणि योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. साधारणत: दसरा आटोपल्यावर घरोघरी दिवाळीचे वेध लागल्यावर घराची साफसफाई आणि विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी उसळली आहे.दिवाळीसाठी क्रॉफर्ड मार्केट, दादर, भुलेश्वर, नटराज मार्केट, मशीद बंदर अशा अनेक बाजारपेठा विविध वस्तूंनी सज्ज झाल्या आहेत. रंगीबेरंगी आकाश कंदील, आकर्षक पणत्या, फटाके, कपडे आणि पूजेसाठी लागणारे साहित्य अशा नानाविध साहित्यांच्या खरेदीस बाजारपेठांमध्ये झुंबड उडाली होती. प्रत्येक वस्तूच्या दरात १० ते १५ टक्के वाढ झाल्याने लोकांनीही हात आखडता घेतच दिवाळीची खरेदी केल्याचे आढळून आले. मात्र, असे असले तरी खिशाला परवडण्याजोगी खरेदीसाठी ग्राहकांची लगबग दिसत आहे. (प्रतिनिधी)रेडिमेड फराळगेल्या काही वर्षांपासून रेडिमेड फराळाला पसंती मिळत आहे. चकली, कडबोळी, करंजी, शंकरपाळी, रवा लाडू, बेसन लाडू, चिवडा, चिरोटे, अनारसे, शेव आणि नानकटाई अशा तिखट-गोड फराळाचे रेडिमेड पॅकेजेस उपलब्ध आहेत. अगदी ३ किलोपासून हे पॅकेजेस असून देशभरात आप्तेष्टांना पाठविण्याची सेवा उपलब्ध आहे. सुका मेवा गिफ्ट्सचे आकर्षणदिवाळीच्या उत्सवात अलीकडच्या काळात सुका मेवा आणि चॉकलेट्सचे गिफ्ट बॉक्स देण्याची क्रेझ वाढत आहे. यंदाही विविध आकर्षक बांधणी असलेले गिफ्ट बॉक्स बाजारात आले आहेत. त्यामध्ये लखनवी व दिल्लीहून आलेल्या सुका मेव्यांच्या गिफ्ट बॉक्सना अधिक मागणी आहे. याशिवाय भारतीय कंपन्यांसह विदेशी कंपन्यांचे चॉकलेट गिफ्ट बॉक्सची खरेदी मोठ्या प्रमाणावर होत आहे. चॉकलेट बॉक्स भेट देण्याकडेही कल वाढत आहे. यात भारतीय कंपन्यांसह स्वित्झर्लंडच्या चॉकलेट गिफ्ट बॉक्सेसना मोठी मागणी आहे. विविध प्रकारच्या चॉकलेट गिफ्ट बॉक्सच्या किमती १५० पासून ५ हजार रुपयांपर्यंत आहेत.फटाक्यांची प्रकाशमय ‘नवलाई’यंदा मार्केटमध्ये आवाजापेक्षा विविध प्रकारचे प्रकाशमय असणारे फटाके दाखल झाले आहेत. शिवाय, यंदा फटाक्यांच्या विक्रेत्यांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ‘मेड इन चायना’वरील बहिष्कारही अंगीकारलेला दिसून येतो. लालबाग-क्रॉफर्ड मार्केटमधील काही विक्रेत्यांनी केवळ भारतीय बनावटीचे फटाके विकण्याचा चंग बांधला आहे.इन्स्टंट रांगोळ्यांची सजावटठिपक्यांच्या रांगोळींमध्ये तरुणी-गृहिणींचा बराच वेळ जातो. यावर उपाय म्हणून गेल्या काही वर्षांत रांगोळीचे स्टीकर्स बाजारात आले होते. त्या स्टीकर्सना खूप मागणी दिसून आली, त्यानंतर यंदा ‘इन्स्टंट’च्या जमान्यामुळे आता प्लास्टिकच्या तुकड्यांची रांगोळी मार्केटमध्ये उपलब्ध आहे. रंगीत प्लास्टिकच्या तुकड्यांना कोयरी, फूल अशा आकारात ठेवून त्यावर मोती, कुंदन लावून त्यांच्या विविध नक्षी बाजारात दाखल झाल्या आहेत. दुकाने सजलीवेगवेगळ्या कंपन्यांचे गॅझेट्स बाजारात दाखल झाल्याने त्यांच्या खरेदीकडे तरुणाईचा अधिक कल दिसून येतो आहे. याशिवाय विजेचे दिवे, दिव्यांच्या माळा, आकाश दिवे, कापड, साड्या आदींकडे ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी दुकानदारांनी दुकाने सजवली आहेत. अनेक ठिकाणी सेल, सवलतीचे फलक झळकत आहेत. पणत्यांचे ढीग बाजारात दिसत आहेत. याशिवाय विविध आकारातील मेणबत्त्या, मेणाचे दिवे, विविध रंगांच्या रांगोळ्या, लक्ष्मीच्या मूर्ती व छायाचित्रे आदींची दुकाने आहेत. सराफा, सुकामेव्याची दुकानेही सज्ज आहेत. बाजारात खरेदी सुरू झाली आहे.