होळी, रंगपंचमीच्या खरेदीसाठी बाजारपेठा हाऊसफुल्ल, कृत्रिम रंगांना अधिक पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 04:46 AM2019-03-20T04:46:51+5:302019-03-20T04:47:19+5:30
होळी हा सण रंगांचा आणि नात्यांचा साजरा करताना पर्यावरणाची ही काळजी घेतली पाहिजे. यासाठी कृत्रिम रंगांऐवजी नैसर्गिक रंगाचा आग्रह नागरिकांनी धरला पाहिजे.
मुंबई - होळी हा सण रंगांचा आणि नात्यांचा साजरा करताना पर्यावरणाची ही काळजी घेतली पाहिजे. यासाठी कृत्रिम रंगांऐवजी नैसर्गिक रंगाचा आग्रह नागरिकांनी धरला पाहिजे. मंगळवारी दादर व मस्जिद बंदर विविध रंगांनी सजले होते़ ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. होळीनिमित्त लहान-मोठ्या रंगीबेरंगी पिचकाऱ्यांनी बाजारपेठा सज्ज झाल्या होत्या.
पिचकारीसाठी बच्चे कंपनींची दुकानांमध्ये गर्दी होती़ छोटा भीम, मोटु-पतलू, डोरेमॉन, सिनचॅन इत्यादींच्या पिचकाऱ्या मार्केटमध्ये दाखल झाल्या आहेत. बाजारात पिचकाऱ्यांची किंमत ५० रूपयांपासून ते ५०० रूपयांपर्यंत सुरू आहे. मार्केटमध्ये कृत्रिम रंगांच्याऐवजी नैसर्गिक हर्बल रंग विकण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. हा हर्बल रंग १२० रूपयांनी बाजारात उपलब्ध आहे. बाजारात दहा रूपये पॅकिंगप्रमाणे रंगांची विक्री सुरू आहे. केमिकल रंग न विकता जे शरीराला हानिकारक नाही असेच नैसर्गिक रंग विकले जात आहेत, असे रंग विक्रेत्यांना सांगितले. होळीमध्ये भरपूर सुकी लाकडे वापरली जातात, त्यामुळे झाडे तोडली जातात. होळी हा आनंदाचा व रंगाचा सण असून यात रंग की आरोग्य? यातून एक निवड करणे कठीण असते.
‘रंग खेळताना घ्या आरोग्याची काळजी’
मुंबई : ‘बुरा ना मानो होली है..’ असे म्हणत एखाद्याला रंग लावायला जाताना यंदा जरा जपूनच.. असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. सण साजरा करत असताना रंगाचा बेरंग होऊ नये यासाठी खबरदारीचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
होळी व रंगपंचमी हे सण आल्यावर बच्चेकंपनीपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच उत्साह शिगेला पोहोचतो. एकमेकांवर फुगे मारल्यापासून घातक रंग वापरण्याची चढाओढ सुरू असते. या रंगात रासायनिक पदार्थांचे मिश्रण केले असल्याने ते आरोग्यास अपायकारक ठरते. त्यामुळे, या रंगापासून दुसºयाचे आयुष्य उद्धवस्त होणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे, असे डॉक्टर सांगतात.
रेल्वेने केल्या उपाययोजना
होळी आणि धूलिवंदनाच्या दिवशी सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. मात्र या उत्साहाच्या भरात काहीजण चालत्या लोकलवर रंगानी भरलेले पाण्याच्या पिशव्या, फुगे मारण्याचे प्रकार होतात. यामुळे लोकलमधून प्रवास करणाºया प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होतो. या कारणास्तव होळीच्या सणाला कोणतेही गालबोट लागू नये, यासाठी मुंबई पोलीस व रेल्वे पोलिसांनी विशेष उपाययोजना राबविल्या असून जनजागृतीचे काम केले जात आहे.
डोळ्यांची काळजी अशी घ्या
कोणीही चेहºयाला रंग लावत असल्यास डोळे बंद करून घ्या, डोळ्यांत रंग गेल्यास हात धुवून डोळा स्वच्छ पाण्याने धुवा. पाण्याचा फुगा डोळ्यांवर बसल्यास बर्फाने डोळा शेका. डोळा दुखायला लागला, लाल झाला तर तत्काळ डॉक्टरांना दाखवा. लेन्स लावून रंगपंचमी खेळू नका.