Join us

चारकोप बोरीवली बाजारपेठांत दुकाने सताड उघडी ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अंशतः लाॅकडाऊनच्या राज्य शासनाच्या निर्णयाला बाजारपेठांनी आणि दुकानदारांनी पायदळी तुडविल्याचे चित्र कांदिवलीमधील चारकोप ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अंशतः लाॅकडाऊनच्या राज्य शासनाच्या निर्णयाला बाजारपेठांनी आणि दुकानदारांनी पायदळी तुडविल्याचे चित्र कांदिवलीमधील चारकोप मार्केट आणि बोरीवलीमध्ये पाहायला मिळाले. बोरीवलीमध्ये मुख्य बाजारपेठेत पोलिसांच्या गाडीमुळे रस्त्यावरील दुकाने बंद करण्यात आली तरी देवीपाडा, काजूपाडा, मागाठाणेसारख्या परिसरांतील छोट्या छोट्या बाजारपेठा फुल्ल गर्दीत सुरू असलेल्या पाहण्यास मिळत होत्या. तेथील दुकानदार आणि ग्राहक या दोघांनाही त्याची भीती नव्हती आणि हेच चित्र दिवसभर चारकोप मार्केटमध्येही दिसले.

या काळात किराणा, औषधे, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा ३० एप्रिलपर्यंत बंद राहतील अशा सूचना देऊनही स्नॅक्स, कपड्यांची दुकाने, चपलाची- खेळाच्या साहित्याची आणि याशिवाय चहाच्या टपऱ्यांची दुकाने ठिकठिकाणी नाक्यावर सुरू असलेली पाहायला मिळत आहेत. साहजिकच नेहमीप्रमाणे लोकांची गर्दी होत असल्याने दिवसा लागू केलेल्या जमावबंदीचा फज्जा येथे उडालेला दिसत आहे. या दुकानदार आणि विक्रेत्यांना नियमांबद्दल विचारल्यास शनिवार-रविवारी असलेल्या लॉकडाऊनच्या काळात सर्व काही बंद राहणार असल्याची त्यांची समजूत असल्याचे कळत आहे. नियमांबद्दल असलेली अपुरी माहिती आणि बाजारपेठेत न पोहोचणारे पोलीस यांमुळे गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

कांदिवली, बोरीवली, मालाड परिसरात दररोज रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत येथील या मुख्य बाजारपेठांत होणारे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन, शासनाच्या निर्देशांची अंमलबजावणी न करता दुकानदार, व्यापाऱ्यांकडून होणारा निषेध आरोग्याच्या दृष्टीने घटक ठरू शकतो. फळे, भाजीपाला आणि इतर काही वस्तूंची खरेदी करण्यासाठी आलेल्या या गर्दीत कित्येक जणांनी तर मास्कही वापरला नसल्याचे दिसत आहे. नागरिक आणि विक्रेत्यांचे हे निर्धास्त वर्तन एकीकडे कोरोना रुग्णसंख्या वाढीस कारण ठरत आहे, तर तिथे प्रशासनाची डोकेदुखीही वाढवत आहे.

1)फोटो : चारकोप मार्केट