मुंबई : राजर्षी शाहू महाराज अनुदानित वसतिगृह योजनेतील वसतिगृहात काम करणाऱ्या ८००० कर्मचाऱ्यांना सरकारी वेतनश्रेणी लागू करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचटणीस व प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी केली आहे. या योजनेनंतर सामाजिक न्याय खात्याच्या अनेक योजना आल्या व त्यानुसार अनुदानित आश्रमशाळा, अंध, अपंग, मूकबधिर योजनेतील शाळांच्या वसतिगृह कर्मचाऱ्यांना वेतणश्रेणी लागू झाली आहे. परंतु, शाहू योजनेतील हे कर्मचारी आजही समान काम समान वेतनापासून वंचित आहेत, त्यांना सरकारी नियमानुसार वेतन मिळणे आवश्यक आहे.
राज्यस्तरीय पारितोषिकासाठी आवाहन
मुंबई : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी दिल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिकाच्या २०२१ या वर्षासाठी आवाहन करण्यात आले आहे. कृषि-औद्योगिक समाजरचना व्यवस्थापन, प्रशासन, सामाजिक एकात्मता, ग्रामीण विकास, मराठी साहित्य, आदी क्षेत्रांत कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेस देण्यात येणार आहे. रोख २ लाख रुपये व मानपत्र असे त्याचे स्वरूप आहे. या पारितोषिकासाठी संस्था व व्यक्तींची नावे विहित पद्धतीनुसार सुचविण्यासाठी व पारितोषिक नियमावलीसाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई या पत्त्यावर ३० सप्टेंबरपर्यंत पाठवावीत.