Join us  

‘शॉर्ट सर्किट’, फायर ब्रिगेडचा ‘लेट मार्क’ फायर ब्रिगेडला लोकेशन सापडेना?

By जयंत होवाळ | Published: October 07, 2023 7:52 AM

अग्निशमन दलाला पेट घेतलेल्या जय भवानी इमारतीचे लोकेशन सापडत नव्हते.

जयंत होवाळ

मुंबई : गृहनिर्माण संस्थांनी इमारतीच्या फायर  ऑडिटचा अहवाल मुंबई अग्निशमन दलाच्या कार्यालयात सादर करणे किंवा मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक आहे. मात्र किती संस्थांनी अहवाल सादर केले, किती संस्थानी  ऑडिट अहवाल सादर केले नाहीत, त्यांच्यावर काय  कारवाई करण्यात आली, याबाबत कोणतीही माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध नाही.

 महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ अन्वये इमारतींचे मालक-भोगवटादार-गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या इमारतीचे फायर ऑडिट परवानाधारक अग्निशमन यंत्रणेमार्फत करून घेणे आणि त्याचा अहवाल सादर करणे बंधनकारक आहे.

तपासणी होते; पण पुढे काय?

आगीच्या घटनेनंतर संबंधित आस्थापना किंवा इमारतीत अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आली आहे का, ती  सक्षम होती का, याची माहिती घेतली जाते. यंत्रणा नसेल तर संबंधितांना नोटीस दिली जाते. मिळाल्यानंतर १२० दिवसांत यंत्रणा  बसवणे बंधनकारक असते. नियम न पाळणाऱ्या किती इमारतींवर कारवाई केली, याचा तपशील पालिकेने आजपर्यंत जाहीर केलेला नाही.

न्यायालयानेही घेतली होती दखल

 उत्तुंग इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) देण्यापूर्वी त्यांची अग्निसुरक्षा कशी तपासली जाते, आजतागायत किती इमारतींची तपासणी केली, याविषयी तपशीलवार प्रमाणपत्र देण्याचे आदेश  २०१५ साली उच्च न्यायालयाने एका प्रकरणात महापलिका व अग्निशमन दलाला दिले होते.

माहिती अधिकार कार्यकर्त्याचा आरोप

 गेली अनेक वर्षे आपण फायर ऑडिट झालेल्या मुंबईतील इमारतींची माहिती मागत आहे, त्यासाठी आयुक्त आणि संबंधित अधिकारी यांच्याकडे लेखी म्हणणे मांडले होते.

 परंतु मला आजपर्यंत ही माहिती देण्यात आलेली नाही, असे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितले.

कमला मिल आगीनंतर उडाली होती धावपळ

 २०१७ साली कमला मिलमधील पबच्या गच्चीवर लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाल्यानंतर पालिका प्रशासन आणि अग्निशमन दल खडबडून जागे झाले होते.

 त्यानंतर पालिकेने मुंबईतील ३२ हजार ६१५ ठिकाणी तपासणी करून १७ हजार आस्थापनाना नोटिसा बजावल्या होत्या. त्यापैकी ९ हजार ४०७ ठिकाणी कायदेशीर कारवाई सुरू केली होती.

 कमला मिल आग प्रकरणी पालिकेच्या पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते तर १ अबव्ह पबच्या दोन मालकांना व त्यांच्या काकाला अटक करण्यात आली होती.

अग्निशमन दलाला पेट घेतलेल्या जय भवानी इमारतीचे लोकेशन सापडत नव्हते. त्यामुळे त्यांना यायला विलंब झाला, असे सांगण्यात येत आहे. तसेच या ठिकाणी रस्त्यात मोठ्या प्रमाणात दुचाकी पार्क करण्यात आल्याने अग्निशमनच्या जवानांना आज जाण्यातही मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाले होते. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी पार्क केलेली वाहने टोइंग केली.

... आणि तिसऱ्याचा घात

इमारतीच्या पार्किंग परिसरात वाघरी समाजातील लोकांची कपड्यांची मोठमोठी गाठोडी ठेवण्यात आली होती. या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांचे आपापसांत बरेच वादही होते. तसेच या ठिकाणी गर्दुल्ले, नशा करणारे यांचाही वावर होता. त्यामुळे ही आग लागली की लावली, या प्रकरणी पोलिस तपास सुरू आहे.

मी मित्रांसोबत जय भवानी इमारतीच्या खालीच होतो. रात्री दीडच्या सुमारास आधी पहिल्या आणि नंतर दुसऱ्या मजल्यावर शॉर्टसर्किट झाले आणि त्यानंतर आग लागली. ते पाहून आम्ही त्या दिशेने धावलो. आग पाहून घाबरलेले काहीजण खोलीत शिरले, तर काहीजण सातव्या मजल्यावर आणि उर्वरित टेरेसवर धावले. अंधार आणि धुरामुळे काहीच कळत नव्हते आणि श्वासही गुदमरू लागला. जवळपास तासाभराने अग्निशमन दलाची गाडी आली. आमच्या नातेवाइकांना आम्ही सरकारी तर लहान मुलांना खासगी रुग्णालयात हलवले. मृतांचे मृतदेह घेण्यासाठी रुग्णालयासमोर थांबलो होतो.

- शशी वाघरी, प्रत्यक्षदर्शी