मुंबई - निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते विनय आपटे यांच्या दहाव्या स्मृतीदिनानिमित्त विनय आपटे प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या लघुपट स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला. स्पर्धेच्या पहिल्या गटात भावेश परबच्या 'स्लोडाऊन' या लघुपटाने, तर दुसऱ्या गटात सुचित पाटीलच्या 'टर्टल'ने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
गुरु नानक खालसा महाविद्यालयामध्ये झालेल्या या कार्यक्रमात भारत दाभोळकर, सुकन्या कुलकर्णी, पुष्कर श्रोत्री, चिन्मयी सुमित, उपेंद्र लिमये, प्रतिमा कुलकर्णी, संजय मोने, लोकेश गुप्ते, महेश लिमये, विजय पाध्ये आदि रंगकर्मी उपस्थित होते. या स्पर्धेतील १८ वर्षे ते २५ वर्षे वयोगटात 'स्लोडाऊन' लघुपटाने प्रथम क्रमांक पटकावत १५ हजार रुपये आणि मानचिन्ह हे पारितोषिक पटकावले. प्रथमेश नाईकच्या 'वेग'ने द्वितीय, तर ध्रुव कौशलच्या 'आय अॅम कियान'ने तृतीय क्रमांक मिळवला. २५ वर्षांवरील खुल्या गटात 'टर्टल'ने प्रथम, हर्षदा उदगीरकरच्या 'जरा विसावू या वळणावर'ने द्वितीय, तर सुमित चौधरीच्या 'नीती' तृतीय क्रमांकाच्या पुरस्कारावर नाव कोरले. या स्पर्धेसाठी एकूण ३६ प्रवेशिका आल्या होत्या. प्रतिमा कुलकर्णी, पुरुषोत्तम बेर्डे, राजन वाघदरे, रोहिणी निनावे, भक्ती मायाळू आणि भारत दाभोळकर यांनी परीक्षक म्हणून काम केले.
विनय आपटे प्रतिष्ठाच्या विश्वस्त वैजयंती आपटे यावेळी म्हणाल्या की, आयुष्यभर शिक्षकाच्या भूमिकेत असलेल्या विनय यांनी मराठी रंगभूमीवर अनेक नवोदितांना संधी दिली. त्यांच्या तालिमीत घडलेले महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, सुनील बर्वेंपासून संकर्षण कऱ्हाडेंपर्यंत अनेकजण आज अभिनय-दिग्दर्शन क्षेत्रात आघाडीवर आहेत. प्रतिष्ठानच्या माध्यमातून विनय यांचे कार्य पुढे चालू ठेवले असल्याचेही वैजयंती म्हणाल्या.
भारत दाभोळकर, उपेंद्र लिमये, राजन वाघदरे आदींनी विनय यांच्या आठवणी जागवल्या. खालसा महाविद्यालयाचे प्रमुख डॉ. किरण माणगावकर म्हणाले की, खालसा महाविद्यायाला आता अनेक मराठी स्पर्धांमध्ये सहभागी होत आहे आणि यंदाच्या आयएनटी आणि ईप्टाआंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. पुष्कर श्रोत्रीने स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांचे आभार मानत स्पर्धेतील सर्व लघुपट प्लेनेट मराठी ओटीटीवर दाखवले जाणार असल्याची घोषणाही केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता गवाणकर यांनी केले.